नवीन ११ केंद्रे तयार करण्यासाठी पुरवठा विभागाकडून प्रस्ताव
कल्पेश भोईर
वसई: वसईतील शिधापत्रिकाधारक व त्याचे लाभार्थी यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता पुरवठा विभागाकडून अतिभार असलेल्या शिधावाटप केंद्रांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात नवीन ११ शिधावाटप केंद्रे तयार व्हावी यासाठी पुरवठा विभागाकडून जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. सध्या वसईत १७९ इतकी शिधावाटप केंद्रे आहेत. त्यात अंत्योदय शिधापत्रिका तीन हजार ७१९, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक एक लाख ३२ हजार ७१९ हे शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. त्यातच शहराचे नागरीकरण झपाटय़ाने वाढू लागले आहे. हळूहळू शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांची संख्याही वाढत आहे. सध्या पाच लाख ७५ हजार ७५९ इतक्या लाभार्थी नागरिकांना धान्य दिले जात आहे. विरार पूर्व पश्चिम, गोखिवरे, तुळिंज, चंदनसार, संतोषभवन, आचोळे अशी सर्वाधिक शिधापत्रिकाधारकांनी नोंद असलेली केंद्रे आहेत.
शासनाच्या नियमानुसार एका केंद्रावर ६ हजार लाभार्थ्यांना धान्य दिले जाऊ शकते. मात्र काही ठिकाणी केंद्रावर त्याहून अधिकचे लाभार्थी आहेत. त्यामुळे अतिभार असल्याने अनेकदा शिधावाटप केंद्रावर मोठी गर्दी असते. त्यामुळे लाभार्थी व शिधावाटप करणारे यांनाही अडचणी निर्माण होतात. तर काहींना केंद्रे दूरच्या अंतरावर पडत असल्याने नागरिकांची फरफट होत असते.
यासाठी वसई तालुका पुरवठा विभागाकडून या केंद्राचा विस्तार करून नवीन शिधावाटप केंद्र तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ११ नवीन केंद्रे तयार व्हावी यासाठी प्रस्ताव करून जिल्हा पुरवठा विभाग यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांनी दिली आहे. जर ही केंद्रे मंजूर झाली तर शिधापत्रिकाधारक यांची केंद्रावर होणारी गर्दी व गोंधळ कमी होणार आहे.
काही लाभार्थ्यांकडून धान्याची उचलच नाही..
शासनाकडून शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत त्यांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र यातील काही लाभार्थी हे धान्याची उचलच केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीदरम्यान ६ हजार ५४४ लाभार्थ्यांनी एकदाही धान्याची उचल केली नसल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
वसईत मोठय़ा संख्येची लाभार्थी नोंद असलेली शिधावाटप केंद्रे आहेत. त्यांचा विस्तार केला जाणार आहे. तसा प्रस्ताव तयार करून आम्ही जिल्हा पुरवठा विभाग यांना सादर केला आहे.
– रोशन कापसे, पुरवठा अधिकारी वसई.