वाहतुकीचे नियम डावलून जुनाट वाहनांतून पाणी वाहतूक

विरार :  शहरात टँकरमाफियांनी पुन्हा एकदा वाहतुकीचे नियम डावलून वैधता संपलेली आणि भंगारातील वाहने रस्त्यावर आणायला सुरुवात केली आहे. या वाहनांमुळे नागरिक आणि पर्यावरण दोहोंना धोका आहे. ‘लोकसत्ता’ने सातत्याने टँकरमाफिया आणि त्यांच्या वाहनांच्या बाबतीत वृत्तांकन केले आहे. यामुळे वाहतूक शाखा आणि परिवहन विभाग यांनी अशा वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. परंतु सध्या ही कारवाई काहीशी थंडावल्याने टँकरमाफियांचे ये रे माझ्या मागल्या असे सुरू झाले आहे. भंगारातील आणि जुनाट टँकर पुन्हा रस्त्यावर दिसू लागले आहेत.

विरार पूर्वेला फुलपाडा परिसरात अशाच एका वाहनामुळे होणारा अपघात अगदी थोडक्यात टळला होता. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, वाहन क्रमांक एम डब्लू एन २७६५ या क्रमांकाचा टँकर पाणी भरून विरार, फुलपाडा दिशेने जात असताना दुभाजकावर आदळण्यापासून जेमतेम वाचला होता. या वेळी या वाहनाची परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरून माहिती काढली असता, सदर वाहनाची नोंदणी ही १ जानेवारी १९८७ मध्ये झाली असून ते ३५ वर्षे जुने आहे. तसेच त्याचा फिटनेस कालावधी २९ एप्रिल २०२० रोजी संपला असून विमासुद्धा २४ एप्रिल २०१९ मध्ये संपला आहे, अशी माहिती मिळाली. या वाहनाची प्रदूषणसंदर्भातील पीयूसी मे २०२० मध्ये संपली होती, तर परवानासुद्धा ८ जून २०२० रोजी संपला होता. यामुळे हे वाहन वाहतुकीसाठी धोकादायक असतानाही सर्रास या वाहनातून पाणी वाहतूक केली जात होती. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला तसेच पर्यावरणालाही धोका आहे.

परंतु सध्या असे शेकडो टँकर रस्त्यावर बिनदिक्कत फिरत आहेत. वाहतूक विभागाकडून मागील वर्षीच्या माहितीनुसार शहरात मागील पाच वर्षांत ५९ जणांचे बळी टँकर अपघातांत गेले आहेत, तर ६० हून अधिक जणांना कायमचे अपंगत्व आले आणि १५० हून अधिक अपघातांची नोंद झाली आहे. परिवहन विभागाकडे १३६ टँकरची नोंद आहे. परिवहन विभागाने माहिती दिली की, टँकर व्यावसायिक नव्याने टँकर खरेदी करत नाहीत. ते इतर ठिकाणाहून जुनी वाहने खरेदी करतात. त्यामुळे त्यांची नोंद होत नाही.  टाळेबंदीदरम्यान केलेल्या कारवाईत १४० हून अधिक टॅंकर तंदुरुस्त नाहीत तसेच पाणी वाहतुकीस अयोग्य असल्याचे आढळून आले होते. तरीसुद्धा असे शेकडो टँकर पाणी वाहतूक करत आहेत. तसेच वाहतूक शाखेने घालून दिलेले कोणतेही नियम टँकरचालकांकडून पाळले जात नाहीत आणि मनमानी वाहतूक केली जाते, यामुळे शहरामध्ये अपघातांचे प्रमाण वाढत आहे. 

कारवाईच्या अपेक्षेत

टॅंकरमधून पाणी सांडणे, वाहतुकीस नादुरुस्त टॅंकर वापरणे, टॅंकरवर क्लीनर नसणे, अप्रशिक्षित चालक, प्रादेशिक परिवहनाच्या कागदपत्रांची पूर्तता न करणे, अशा प्रकारे अनेक नियमांचे उल्लंघन करूनही वसईत शेकडो टँकर चालत आहेत, मात्र वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. 

Story img Loader