वसई: नालासोपाऱ्यात पाईप गॅस जोडणी करण्याचे काम सुरू असताना स्फोट झाला आहे. शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. यात दुर्घटनेत ४ जण होरपळले असून त्यात ३ कामगार आणि एका रहिवाशाचा समावेश आहे.

नालासोपारा पूर्वेच्या गाला नगर येथील चंद्रेश हिल्स या इमारतीत गुजरात गॅस कंपनीचे गॅस जोडणीचे काम सुरू होते. शनिवारी सायंकाळी गुजरात गॅस कंपनीचे तीन मजूर त्याठिकाणी गॅस जोडणी करण्याचे काम करीत होते. मात्र गॅस पुरवठा होत असलेल्या वाहिनीची झडप (वॉल) बंद न केल्याने अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगार आणि एक रहिवासी होरपळले आहेत. अंगद कुमार, विशाल कुमार आणि सतीश कुमार अशी जखमींची नावे असून त्यांना नालासोपारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले आहे.यापूर्वी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे रोडवरील द्वारकाहॉटेल जवळ गुजरात गॅस वाहिन्यांचा स्फोट झाला होता. त्यात हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत तीन जण जण होरपळले होते.

हेही वाचा >>>वसई : चिंचोटी धबधब्याजवळ पर्यटकांची हुल्लडबाजी

गुजरात गॅसचा निष्काळजीपणा

शहरातील काही भागात गुजरात गॅस कंपनीतर्फे पाईप गॅस पुरवठा करण्यात येत आहे. मात्र गॅस जोडण्या देत असताना कामादरम्यान होत असलेल्या निष्काळजीपणामुळे सातत्याने अशा घटना समोर येत आहे. याशिवाय अनुभव व प्रशिक्षण दिलेले कर्मचारी ही कामासाठी ठेवले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.