लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई: विरारच्या राजोडी समुद्र किनाऱ्यावरील एका रिसॉर्ट मध्ये सुरू असलेले एक बोगस कॉल सेंटर अर्नाळा सागरी पोलिसांनी उघडकीस आणले. याप्रकरणी ५३ जणांना अटक करण्यात आली आहे. या कॉल सेंटर द्वारे ऑस्ट्रेलियन बँकेची फसवणूक केली जात होती.
वसई पश्चिमेच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक रिसॉर्ट आहेत. राजोडी येथील एका रिसॉर्ट मध्ये एक बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांना मिळाली होती. शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा मारला. यावेळी बोगस कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळले. रविवार पहाटे पर्यत ही कारवाई सुरू होती.
या कॉल सेंटर मधून ऑस्ट्रेलियाच्या पे पाल या बँकेच्या ग्राहकांचे परस्पर वळवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात होती, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी ५३ जणांना अटक केली. त्यात १३ तरुणी आणि रिसॉर्ट मालक यांचा समावेश आहेत. मागील एक महिन्यापासून हे कॉल सेंटर सुरू होते.
सर्व आरोपी उच्च शिक्षित असून दिल्ली, हरयाणा, पंजाब येथील आहेत. त्यांच्याकडून २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी दिली.