वसई- वसई किल्ला समुद्रकिनार्‍यावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात मुलगा पाण्यात पडला. त्याला वाचवायला गेलेले त्याचे वडीलही बुडाले. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. वसई पोलीस बुडालेल्या पिता-पुत्रांचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पश्चिमेच्या ओम नगर येथे शैलेंद्र मोरे (४२) हे आई आणि मुलगा देवेंद्र (१४) याच्यासोबत रहात होते. रविवारी त्यांनी घरी स्वामी समर्थांचा पाठ आयोजित केला होता. पूजा संपल्यावर निर्माल्य समुद्रात टाकण्यासाठी शैलेंद्र मोरे मुलगा घेऊन दुचाकीने वसई किल्ल्याजवळील समुद्रात गेेले होते. निर्माल्य टाकल्यानंतर देवेंद्रे जेटीवरून सेल्फी काढत होता. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी धावत जाऊन त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारली. मात्र ते देखील बुडाले. एका प्रत्यक्षदर्शीने हा प्रकार पाहिला आणि पोलिसांना कळवले. मात्र ते कोण होते याची माहिती मिळत नव्हती.

हेही वाचा >>>वसईच्या हरित पट्टय़ावर ‘कुऱ्हाड’; ‘आयआयटी’च्या अहवालातून धोक्याचा इशारा

दरम्यान, तिथे असलेल्या दुचाकीवरून सोमवारी दुपारी पोलिसांनी शैलेंद्र मोरे यांचे कुटुंबियांशी संपर्क साधला. वसई पोलिसांचे पथक समुद्रात बेपत्ता पिता-पुत्रांचा शोध घेत आहे. सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. आम्ही साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहोत. आमचे पथक बोटीने सर्व समुद्रकिनार्‍यावर शोध घेत आहोत, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली.

शैलेंद्र मोरे यांचा दातांचे उपकरणे बनविण्याचा व्यवसाय होता. देवेंद्र सेंट ॲन्स शाळेत नवव्या इय्यतेत शिकत होता. त्यांची पत्नी लिला पती पासून विभक्त आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father and son drowned in vasai sea while taking selfie amy
Show comments