वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध प्रकारच्या तांत्रिक बिघाडामुळे वाहने बंद पडतात. मात्र ही बंदवाहने प्राधिकरणाकडून वेळीच बाजूला केली जात नसल्याने अपघाताला कारणीभूत ठरू लागली आहेत.

वसई पूर्वेच्या भागातून मुंबई व गुजरात या भागांना जोडणारा  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावरून दररोज मोठय़ा  संख्येने वाहनांची वर्दळ असते. परंतु काही वेळा महामार्गावर विविध ठिकाणच्या भागात वाहने तांत्रिक बिघाड होऊन रस्त्याच्या मध्येच बंद पडतात.  बंद पडलेली वाहने ही वेळीच रस्त्याच्या मधून बाजूला करणे गरजेचे आहे. परंतु अशी वाहने बाजूला करण्यासाठी महामार्गावर तातडीने कोणतीच यंत्रणा उपलब्ध नाही.

बहुतांश वेळा ही वाहने महामार्गाच्या पहिल्या किंवा मधल्या वाहिनीवर असतात त्यामुळे भरधाव वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांस बंद पडलेली वाहने दिसून येत नसल्याने अपघात होतात. विशेषत: रात्रीच्या सुमारास अंधारात ही वाहने पटकन दिसून येत नाहीत त्यामुळे बंद वाहनांना धडका लागून अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. जेव्हा एखादे वाहन बंद पडते तेव्हा ते क्रेनच्या साहाय्याने तातडीने बाजूला करणे आवश्यक आहे. तशी कोणतीच व्यवस्था प्राधिकरणाकडून होत नसल्याने तासन्तास ही वाहने जागच्याजागीच दुरुस्त होईपर्यंत उभी असतात. याचा फटका इतर वाहनचालकांना बसू लागला आहे.

Story img Loader