लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : वसईतील तुंगारेश्वर डोंगरावर असलेल्या महादेव मंदिरात जाण्यासाठी वनविभाग पर्यटकांकडून ७१ रुपये वाहन शुल्क आकारत आहे. यामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वनखात्याने केवळ श्रावणात शुल्क न आकारण्याची सवलत दिली आहे. परंतु कामयस्वरूपी शुल्क माफ करावे यासाठी आता शिवसेनेनेही आंदोनलाचा इशारा दिला आहे.
वसईच्या निसर्गरम्य पर्वतांच्या कुशीत असलेले तुंगारेश्वर महादेव मंदिर हे पालघर जिल्ह्यासह ठाणे, कल्याण ,मुंबई या भागातील लाखो लोकांचे हे श्रद्धा स्थान आहे. या तुंगारेश्वर महादेव मंदिराला राज्य सरकारने २००१ साली ‘क’ वर्गीय पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तुंगारेश्वर मंदिरापासून ४ मैलांवर मत्यच्च पर्वत शिखरावर भगवान परशुरामांच्या वास्तव्याने पावन झालेले ‘परशुराम कुंड’ हे तीर्थक्षेत्र आहे. तिथेच प्रसिद्ध संतश्री बालयोगी सदानंद महाराजांचे तिथेच प्रसिद्ध संतश्री बालयोगी सदानंद महाराजांचा आश्रम आहे. त्यामुळे या मंदिराचे विशेष असे महत्व आहे. श्रावण महिना, महाशिवरात्र तसेच वर्षभर लाखोंच्या संख्येने शिवभक्त या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. मात्र या जागृत महादेव मंदिरात जाण्यासाठी प्रत्येक भाविकांकडून कर आकारला जातो आहे.
तसेच प्रत्येक वाहनामागे ७१ रुपयांचा कर आकारला जात असून प्रत्येक वाहनाप्रमाणे हा कर कमी जास्त केला जातो. यामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. कर वसुली होत असताना त्याप्रकारच्या सुविधा देखील भक्ताना मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे या मंदिरात येणाऱ्या भक्तांकडून ही वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
भक्तांकडून आकाराला जाणारा या कर बंद करावा आणि प्रवेश निःशुल्क करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वसई तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. या मंदिरात येणारे भाविक हे येथील भुमीपुत्र आणि सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांच्याकडून अशी शुल्क आकारणी करणे म्हणजे त्यांच्या श्रध्देचा बाजार मांडण्याचा प्रकार आहे. आम्ही सतत मागणी करत आहोत परंतु शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. हे शुल्क कमी न केल्यास शिवेसनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा काकासाहेब मोटे यांनी दिला आहे.
श्रावण महिन्यात केवळ सवलत
शंकर महादेवाचे मंदिर असल्याने श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. या भाविकांना श्रावण महिन्यात तरी प्रवेश शुल्क माफ करावी अशी विविध पक्षांनी मागणी केली होती. या मागणीसाठी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि माजी आमदारराजेश पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन शुल्क माफ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार फक्त श्रावण महिन्यात शुल्क माफी करण्यात आली आहे.