वसई : ‘डिजिटल अरेस्ट’ या सायबर फसवणुकीबाबत जनजागृती केली जात असली तरी अजूनही उच्चशिक्षित या फसवणुकीला बळी पडत आहे. वसईतील एका महिला वकिलाची सायबऱ भामट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तोतया सीबीआय अधिकार्‍याने मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे असे सांगून त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ केले आणि अवघ्या ८ दिवसात ५० लाख रुपये उकळले. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५२ वर्षीय फिर्यादी या पेशाने वकील आहेत. २५ मार्च रोजी त्यांना एक फोन आला होता. फोन करणार्‍या व्यक्तीने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्या अधिकार्‍याने जे सांगितलं ते ऐकून महिला वकिलाच्या पायाखालची जमीन सरकली. तुमच्या आधारकार्डाचा गैरवापर करू एक मोबाईल घेण्यात आला आहे आणि त्या मोबाईल मधून अश्लील संदेश पाठविण्यात आले आहेत. तसेच दिल्लीत तुमच्या नावाने एचडीएफसी बॅंकेत एक खाते उघडण्यात आले असून त्या खात्यात मनी लॉंड्रींग आणि इतर गुन्ह्यात समाविष्ट असलेली रक्कम जमा करण्यात आली आहे, असे त्यांना सांगण्यात आले. फोन करणार्‍या व्यक्तीने व्हिडियो कॉल करून समोर सीबीआय कार्यालयाचा असल्याचे भासवले. फिर्यांदी यांचा त्यावर विश्वास बसला आणि त्या सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकल्या. याप्रकऱणी कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून २५ मार्च ते २ ए्प्रिल या कालावाधीत तब्बल ५० लाख ३८ हजार रुपये उकळण्यात आले. ही रक्कम त्यांनी आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या खात्यात पाठवली. पुढे त्यांना संशय आला आणि आपली फसवणूक होत असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ वशई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून वसई पोलीस ठाण्यात ४ अज्ञात मोबाईल धारकांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे डिजिटल अरेस्ट?

डिजिटल अरेस्ट हा फसवणुकीचा नवीन प्रकार आहे. यामध्ये सायबर भामटे स्काईपवरून व्हिडियो कॉल करतात. तुमच्यावर परराज्यात गुन्हा दाखल झाला आहे असे सांगतात किंवा तुकुठल्यातरी घोटाळ्याची चौकशी करत असल्याचे भासवतात आणि डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगतात. विश्वास बसावा म्हणून समोर नकली पोलीस ठाणी दाखवतात. बदनामी पोटी कारवाई टाळण्यासाठी उच्चपदस्थ त्याला बळी पडतात. जे लोकं या भूलथापांना घाबरतात त्यांच्याकडून तडजोडीच्या नावाखाली पैसे उकळले जातात. परंतु प्रत्यक्षात डिजिटल अरेस्ट ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. याबाबत मोठ्या प्रमाणाव जनजागृती केली जात आहे. परंतु तरी देखील लोकं बळी पडत आहेत.डिजिटल अरेस्टच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन घटना वसईत गेल्या काही महिन्यात घडल्या. त्या तिन्ही घटना वसई पोलीस ठाण्याच्या अखत्यारितच घडल्या हे विशेष. यात फसवणुक झालेले तिन्ही जण उच्चपदस्थ आहेत.

४ सप्टेबंर २०२४

वसईत राहणार्‍या एका आयटी तज्ञला सायबर भामट्याने बंगळूर येथील आयबी अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. ५०० कोटींच्या घोटाळ्यात तुमचे नाव आले असल्याचे सांगत स्काईपवरून व्हिडियो कॉल केला. हा आयटी तज्ञ त्यांच्या जाळ्यात सापडला. यानंतर प्रकरण मिटविण्यासाठी त्यांनी त्वरीत बॅंक खात्यातून ७० लाख रुपये या भामट्यांना पाठवले. त्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेले ४० लाख आणि ठेवींमध्ये असलेले पैसे असे एकूण १ कोटी ४१ लाख रुपये भामट्यांना पाठवले. हा सर्व व्यवहार अवघ्या १९ दिवसात घडला.

६ सप्टेंबर २०२४

वसईत बँकेतून निवृत्त झालेला एका वृध्द महिलेला सायबर भामट्यांनी तब्बल २८ लाखांचा गंडा घातला. सायबर भामट्याने रिझर्व बँक ऑफ इंडिया मधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने घेतलेल्या क्रेडिट कार्डचा गैरवापर झाला असून हैदराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या नंतर फिर्यादी यांना हैद्राबाद पोलिसांच्या नावाने व्हिडिओ कॉल आला आणि फिर्यादी यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करत असल्याचे सांगितले. दिवसभर त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर ‘अटक’ करून ठेवली. यातून मार्ग काढण्यासाठी पैशांची मागणी केली. फिर्यादी सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकल्या. तुला ४ वेळा वांद्रे येथील आपल्या बॅंकेत गेल्या आणि २८ लाख रुपये या सायबर भामट्यांना पाठवले. हा सगळा प्रकार अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत घडला.