लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : मागील पंचवीस दिवसांपासून वसई किल्ल्यात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. मंगळवारी पहाटेच्या साडेतीनच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

२९ मार्चला वसईच्या किल्ल्यात बिबट्या आढळून आला होता. तेव्हापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. याशिवाय या भागात नागरिकांना पर्यटनास बंदी घालण्यात आली होती.

आणखी वाचा-वसई: पोलीस ठाण्यातच पोलिसाला मारहाण, पोलिसाचा तुटला दात

त्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने किल्ल्यातील भागात ट्रॅप कॅमेरे, रेस्क्यू पथक, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावले होते. परंतु मानवी वर्दळ व इतर अडचणी यामुळे २० ते २५ दिवस उलटून गेले तरी या बिबट्याचा शोध लागला नव्हता. त्यानंतर वनविभागाकडून सातत्याने बिबट्या पकडण्याच्या नियोजनामध्ये बदल करून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून त्यानुसार पिंजरे लावले जात होते.

मंगळवारी पहाटे अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात येऊन अडकला. २५ दिवसांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.बिबट्या जेरबंद झाल्याने मागील महिनाभरापासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या वसई किल्ल्याच्या परिसरातील किल्ला बंदर, पाचूबंदर भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally forest department succeeded in imprisoning the leopard in vasai fort after 25 days mrj
Show comments