लसीकरण पूर्ण केल्यावरच रात्री १० वाजेपर्यंत परवानगी

विरार: राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून शहरातील सर्व उपाहारगृहांना रात्री १० पर्यंत परवानगी देताना कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक केले आहे. मात्र मोफत लस मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे लसीकरण कसे करायचे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे नाइलाजाने हॉटेल चालकांना आपल्या कर्मचाऱ्यांना विकतच्या लशीकरणाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

वसई-विरार शहरात तेराशेहून अधिक लहान, मोठी उपाहारगृहे आणि खानावळी आहेत. याशिवाय २७९ ‘बार अँड रेस्टॉरंट’ असून यामध्ये जवळपास ५ हजारहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. टाळेबंदी लागू केल्यानंतर उपाहारगृह व्यवसाय ठप्प झाला होता. टाळेबंदी असताना अनेक कर्मचारी आपआपल्या गावी गेले होते. आता उपाहारगृहे पुन्हा सुरू झाल्याने परतीच्या मार्गावर आहेत.

दरम्यान, शासनाने उपाहारगृह कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे आवश्यक म्हटले आहे. पण शहरात लशींचा तुटवडा असल्याने कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नाही. यासदंर्भात उपाहारगृह संघटनांनी वसई-विरार महानगरपालिकेकडे लसीकरणाची विनवणी केली आहे. पण पालिका लस उपलब्ध नसल्याचे सांगत आहे. यामुळे आता या कर्मचाऱ्यांचे लसीकरण कसे करणार हा प्रश्न हॉटेल व्यावसाईकांना पडला आहे.

वसई-विरारमधील उपाहारगृहे सुरू झाल्याने खवय्यांनीसुद्धा उपाहारगृहांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पण उपाहारगृहामधील कर्मचाऱ्यांचे लसीकरणच झाले नसल्याने करोना प्रसाराचा धोका वाढला आहे. शहरातील उपाहारगृह चालक व कर्मचारी यांचे लसीकरण करणे गरजेचे असतानाही याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याने ‘वसई-विरार हॉटेल असोसिएशन’ने कामगारांचे पैसे देऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एका उपाहारगृह चालकाने त्यांच्या उपाहारगृहामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले असून अनेक उपाहारगृहांमधील ९० टक्के कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याचे सांगितले.

मोठय़ा उपाहारगृहांमधील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा भार उपाहारगृहाचे मालक उचलणार असले तरी रस्त्यावरील, उघडय़ावरील टपरीचालक, खानावळ चालक अद्यापपर्यंत लसीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पालिकेला आम्ही अनेक वेळा विनवण्या केल्या आहेत. आम्हाला पहिल्या फळीतील सेवकांचा दर्जा देऊन आमचे लसीकरण पूर्ण करा असे सांगितले आहे. कारण ग्राहकांशी आमचा थेट संपर्क येत आहे. पण पालिकेने आम्हाला कोणतेही सहकार्य केले नाही. यामुळे आम्ही स्वत: पैसे भरून लसीकरण करत आहोत.

– नागराज शेट्टी, सचिव, वसई तालुका हॉटेल असोसिएशन

Story img Loader