वाढती महागाई, अवकाळी पावसाचे विघ्न यामुळे अडचणींत वाढ
कल्पेश भोईर
वसई: अवकाळी पावसाचे विघ्न सरता सरेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम हा वसईच्या भागातील वीटभट्टीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर होऊ लागला आहे. वसईच्या पूर्वेच्या भागातील विविध ठिकाणच्या भागांत बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्याचा व्यवसाय केला जातो. यात शिरवली, कामण, पोमण, नागले, शिलोत्तर, पारोळ, तिल्हेर, भाताणे, नवसई, शिवणसई यासह वसईच्या विविध ठिकाणच्या ग्रामीण भागांत वीटभट्टीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. दरवर्षी दिवाळीनंतर हा व्यवसाय सुरू होत असतो. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून करोनाचे संकट, अवकाळी होत असलेला पाऊस यामुळे सध्या हा व्यवसाय अडचणीत सापडू लागला आहे. जानेवारी महिना सुरू झाला तरी काही ठिकाणच्या जमिनीत पाणी सुकले नसल्याने वीटभट्टी लावता आली नाही, तर दुसरीकडे वीटभट्टय़ा लावण्यास काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. त्यामुळे वीटभट्टय़ांमधील कच्चा माल ढगाळ वातावरणामुळे पाहिजे तसा सुकला जात नसून जर पाऊस पडला तर मालाचे नुकसान होऊ शकते, अशी चिंता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. काहींनी या व्यावसायातून काढता पाय घेत असल्याचे वीट व्यावसायिक वैभव म्हात्रे यांनी सांगितले आहे. वाढत्या महागाई व उत्पादन खर्च यामुळे विटांची किंमत ही ४० ते ५० टक्क्यांनी वाढली आहे. वीट तयार करण्यासाठी लागणाऱ्या कोळसा, तूस, माती, खदानचूर अशा कच्चा मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे. मागील वर्षी कोळशाची किंमत ही आठ ते साडेआठ हजार रुपये होती. तीच किंमत आता १२ ते १५ हजारांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. अशातून सावरणेही आता कठीण होऊन बसले आहे, असे व्यावसायिक उदय घरत यांनी सांगितले.
कोट
अवकाळी पावसाचा फटका, मजूर खर्च, वाढत्या कच्च्या मालाच्या किमती यामुळे वीट व्यवसायात अडचणी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे हा
मजुरांच्या रोजगारावर परिणाम
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक मजूर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या वीटभट्टीवर कामाला जात असतात आणि यावरच लाखो बांधवांचा उदरनिर्वाह हा या वीटभट्टीवरील कामावर चालतो; परंतु विविध संकटांमुळे अनेक वीट व्यवसाय बंद होत असल्याने सर्वच मजुरांच्या हाताला एकाच ठिकाणी काम मिळत नाही, त्यामुळे या मजुरांना आता इतर कामे शोधत फिरावे लागत आहे.