वसई : नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथील कारखान्यात गुरुवारी भीषण स्फोट होऊन तीन कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य सात कामगार जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा वसई, विरारमध्ये उभारण्यात आलेल्या कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चालू वर्षांत ५० ठिकाणच्या कारखान्यांत आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत.

वसई, विरार शहर झपाटय़ाने विकसित आहे. त्यापाठोपाठ वसई, विरारच्या पूर्वेच्या भागात मोठय़ा संख्येने औद्योगिक कारखाने उभे राहत आहेत. मात्र हे कारखाने अनधिकृतपणे उभारले आहेत. तर काही ठिकाणी सुरक्षाविषयक कोणतीही उपकरणे बसविली जात नाहीत. याचा प्रत्यय सातत्याने घडणाऱ्या आगीच्या, स्फोटाच्या दुर्घटनांमधून समोर येऊ लागला आहे. नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथे कॉस पॉवर इलेक्ट्रिक पॅनल बोर्ड तयार करण्याच्या कारखान्यात सिलेंडर बदली करताना स्फोट झाला आणि यात तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सात कामगार जखमी झाले.

अशा अनेक घटना वसई, विरार शहरात घडल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी वसई पूर्वेच्या पोमणजवळील साष्टीकरपाडा येथे सौंदर्यप्रसाधने ठेवण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागून स्फोट झाला होता. त्या वेळी सहा कामगार यात जखमी झाले होते. वसई विरार शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत ५० ठिकाणी कारखान्यांना आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरात महिन्याला सरासरी पाच ते सहा कारखान्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडत आहेत.  या अशा घटना शहरात सातत्याने घडत असल्याने कारखान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर येऊ लागला आहे.

अनेक कारखाने नागरी वस्ती असलेल्या भागातच उभे आहेत. त्यातच काही कारखान्यांत छुप्या पद्धतीने विविध प्रकारचे ज्वलनशील असे साहित्यही  बनविले जाते व ठेवले जाते. जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा असे प्रकार समोर येत असतात. असे प्रकार सातत्याने घडत असतानाही कारखाना सुरक्षा व त्यांची तपासणी याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

ग्रामीण भागात कारखान्यांत वाढ

वसई तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतही मोठय़ा संख्येने कारखाने उभे राहू लागले आहेत. विशेषत: यातील काही कारखाने व त्यांची गोदामे ही बेकायदा चालविली जातात. तर काही कारखान्यांत सुरक्षेच्या नियमांकडे कारखाना मालक दुर्लक्ष करीत असल्याने अनेकदा घडलेल्या दुर्घटना या कामगारांच्या जिवावरही बेतात. त्यामुळे अशा कारखान्यांत सर्व काही सुरळीत आहे किंवा नाही याची पाहणी होणे आवश्यक आहे. जे नियम पाळत नाहीत त्यांच्याविरोधात कारवाई होणे गरजेचे आहे, असे नागरिकांमधून सांगण्यात येत आहे.

महापालिकेकडून तपासणी

विरार : वसई-विरार महापालिकेने  घटनेनंतर आपल्या क्षेत्रातील सर्व कारखान्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

वसईच्या जूचंद्र परिसरातील वाकीपाडा या ठिकाणी बॉयलरचा स्फोट होऊन तीन कामगार दगावले, तर ७ ते ८ कामगार गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर पालिकेला जाग आली आहे. सदरचा कारखाना हा पालिकेच्या हद्दीत नसला तरी पालिकेच्या क्षेत्रात हजारो कारखाने आहेत. त्यात आग लागण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. पालिकेने अग्निसुरक्षा लेखापरीक्षण करण्यासाठी २० हजार नोटिसा बजावल्या आहेत.  या नोटिसांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे आता पालिकेने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

पालिकेकडून अग्निशमन दलाचे विशेष पथक निर्माण केले जात आहे. या पथकाच्या साहाय्याने महापालिका क्षेत्रातील सर्व कारखाने, कंपन्या, औद्योगिक वसाहती यांची पाहणी केली जाणार आहे. यात या कारखान्यांनी पालिकेकडे अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केले आहे की नाही, त्यांनी सांगितलेल्या यंत्रणा बसविल्या आहेत की नाहीत, या यंत्रणा कार्यक्षम आहेत की नाहीत याची तपासणी केली जाणार आहे. ज्या कारखान्यांनी कोणत्याही यंत्रणा बसविल्या नसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अग्निशमन विभागाचे उपायुक्त शंकर खंदारे यांनी सांगितले आहे.

शहरातील कारखान्यांत अग्निसुरक्षेची उपकरणे व इतर व्यवस्था याबाबत तपासणी करण्याचे काम सुरूच असते.  विशेषत: आग लागण्याचे प्रकार हे शॉट सर्किटमुळे होतात. त्यामुळे कारखाना मालकांनी वेळोवेळी विद्युत लेखापरीक्षण केले तर आगीच्या घटना रोखता येतील.  -दिलीप पालव, अग्निशमन अधिकारी, वसई-विरार महापालिका

पालकमंत्र्यांकडून दुर्घटना स्थळाची पाहणी

वसई : नायगाव पूर्वेच्या वाकीपाडा येथील घटनास्थळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला आहे याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या.

याशिवाय यापुढे अशा दुर्घटना घडू नये यासाठी ज्या काही बाबी आवश्यक आहेत याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे अशा सूचना त्यांनी केल्या. कारखाना मालक यांनीही मृतांच्या वारसांना मदत व जे जखमी आहेत त्यांच्या उपचारासाठी खर्च करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शासनातर्फे जी काही मदत आहे ती दिली जाईल असे चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊनही जखमी रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी केली. या वेळी पालघर

जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

पोलिसांकडून तपास सुरू

वाकीपाडा येथे घडलेल्या स्फोटाच्या संदर्भात वालीव पोलिसांची अधिकचा तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, फॅक्टरी निरीक्षकांचा तपासणी अहवाल, कारखान्याला मिळालेल्या परवानग्या यासह विविध बाबी तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी सांगितले आहे.

जखमींची प्रकृती स्थिर

आग स्फोट दुर्घटनेत सात जण होरपळून जखमी झाले होते. यातील पाच जण हे मोठय़ा प्रमाणात भाजले होते. यात जयदीप राव ७२ टक्के, विकास यादव ५० टक्के, जमुना प्रसाद ५४ टक्के, दिनेश कोयारी ६३ टक्के, घनश्याम सहानी ५० टक्के भाजले आहेत तर अन्य दोन किरकोळ जखमी आहेत. या घटनेत जखमी झालेल्या कामगारांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आगीच्या घटना

महिना          आगीच्या घटना

जानेवारी  –           ०६

फेब्रुवारी –             १२

मार्च –                ०८

एप्रिल –              ०६

मे –                 ०६

जून –                 ०५

जुलै –                ०१

ऑगस्ट –             ०४

सप्टेंबर –             ०२

एकूण –                ५०

Story img Loader