वसई : विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा ते डीमार्टपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या विद्युत दुचाकी विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली असून यात ३५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

विरार पश्चिमेच्या डोंगरपाडा ते डीमार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये माय राईड जॉय ई बाईक हे विद्युत गाड्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानाला बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागली. या आगीची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. दुकानाचे शटर बंद असल्याने कटरच्या साहाय्याने तोडून आगीवर नियंत्रण मिळविले. दुकान बंद असल्याने आगीवर नियंत्रण मिळविताना अडचणी येत होत्या, अशी माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.

हेही वाचा – नाल्यात भराव झाल्याने पाणी जाण्याचा मार्ग बंद; आगरी सेनेचे पालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन

हेही वाचा – नालासोपाऱ्यात धोकादायक इमारतीचा पाया झाला कमकुवत; पालिकेकडून १६ कुटुंबाचे स्थलांतर

ही आग शॉर्टसर्किट झाल्याने लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत ३५ विद्युत दुचाकी, २ संगणक, १ लॅपटॉप जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. संगणक खोलीत काही रोख रक्कम होती तीसुद्धा अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून दुकानमालकाच्या हाती सुपूर्द केली आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम अग्निशमन दलाचे जवान सुजन संखे, धनंजय भोईर, स्वप्नील पाटील, अमित गोखले, अलकेश कदम व त्यांच्या पथकाने केली आहे.

Story img Loader