लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : मागील काही दिवसांपासून उष्णतेचा पारा अधिकच वाढू लागला आहे. या उष्णतेमुळे पालिकेच्या कचरा भूमीवर साचलेल्या कचाऱ्यांना आगी लागण्याचे प्रकार घडत आहे. त्यातून बाहेर धुराने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचा कोंडमारा होऊ लागला आहे.
वसई पूर्वेतील गोखीवरे येथील भोयदापाडा पालिकेची कचरा भूमी आहे. जवळपास ४० एकर जागेत ही कचरा भूमी विस्तारली आहे. शहराच्या वाढत्या नागरीकरण यामुळे कचऱ्याची समस्या ही अधिक जटिल बनली आहे. दिवसाला कचराभूमीवर आठशे टनाहून अधिक कचरा गोळा करून आणून टाकला जात आहे. मागील १४ वर्षांपूर्वी कचरा भूमीवर त्यावर विल्हेवाटीचा कोणताच प्रकल्प नसल्याने एका वर एक कचऱ्याचे ढिगारे रचून डोंगर तयार झाले आहेत.
आता जरी बायोमायनींग प्रकल्प राबवून कचरा विल्हेवाट करण्यास सुरुवात केली असली तरीही अजूनही मोठ्या प्रमाणात कचराभूमीवर जुना कचरा पडून आहे. सध्यास्थितीत उन्हाचा पारा अधिकच चढू लागला आहे. त्यामुळे कचरा भूमीवर साचलेल्या कचऱ्यात रासायनिक वायू तयार होऊन आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आगीचा धूर हवेद्वारे आजूबाजूच्या परिसरात पसरत असल्याने प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे.
काही वेळा ही आग धुमसत असते त्यामुळे धुराचा मोठा त्रास जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे वाहनांच्या रांगा लागतात तेव्हा ही त्यातून येत असलेल्या दुर्गंधीने नागरिकांचा कोंडमारा होऊ लागला आहे. यावर पालिकेने योग्य ती उपाययोजना आखावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पालिकेची एकमेव कचराभूमी
सद्यस्थितीत वसईच्या भोयदापाडा येथे पालिकेची एकमेव कचरा भूमी आहे. शहरातील नालासोपारा अग्रवाल नगरी येथे कचरा भूमी आरक्षित केली होती. नुकताच त्यावरील ४१ इमारतीवर कारवाई केली आहे. मात्र त्यानंतर पालिकेने या जागेतील कचराभूमीचे आरक्षण हटवून वसईच्या गास गावात टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला ही कडाडून विरोध झाल्यानंतर ते रद्द करण्यात आले.तर नायगाव जूचंद्र येथेही कचराभूमीच्या आरक्षणाला विरोध आहे. या कचराभूमीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या पालिकेच्या भोयदापाडा येथील कचराभूमीवरच संपूर्ण शहराचा भार असून कचऱ्याचे ढिगारे तयार होऊन सातत्याने आग दुर्घटना समोर येत आहे. त्याचा परिणाम आजूबाजूच्या भागात जाणवू लागला असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
धूर नियंत्रण व कचरा विल्हेवाट प्रक्रिया सुरू
कचरा भूमीवर पसरत असलेला धूर नियंत्रण करण्यासाठी पालिकेने तीन फॉग कॅनन यंत्र आणली असून आग लागणाऱ्या ठिकाणी फवारणी केली जात आहे. याशिवाय १५ लाख मॅट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने सुरवात केली असून आतापर्यंत पाच लाख मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. यासाठी सहा यंत्र लावली असून यामुळे पाच एकर जागेतील कचरा ही खाली झाला आहे. डिसेंबर पर्यंत कचऱ्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल तेव्हा आगी लागण्याच्या घटना कमी होतील असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी सांगितले आहे.