लोकसत्ता प्रतिनिधी
वसई: नायगाव पूर्वेच्या भागात रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांकडून लावलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग शुक्रवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास लागली आहे. या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला.
नायगाव पूर्वेच्या स्थानकालगतच्या भागात मोठ्या संख्येने फेरीवाले विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करण्यासाठी बसतात. रात्री दुकाने बंद झाल्यानंतर आहे त्या ठिकाणी सर्व साहित्य ठेवले जाते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अचानकपणे या दुकानांना आग लागली होती. या लागलेल्या आगीमुळे त्याठिकाणी असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे.
आणखी वाचा-जामीन देण्यासाठी मागितली १ लाखाची लाच, तुळींजच्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
या आगीची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. प्रत्यक्ष जागेवर अग्निशमन दलाचे वाहन पोहचत नसल्याने त्याठिकाणी यंत्रसामग्री घेऊन जाऊन आग आटोक्यात आणली.
या आगीत काही टपऱ्या जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेषतः हा प्रवाशांचा रेल्वे स्थानकात ये जा करण्याचा मुख्य मार्ग आहे.परंतु रात्रीचा सुमार असल्याने येथील वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
आणखी वाचा-नालासोपाऱ्यात टँकरचा ‘ब्रेक फेल’, टँकर थेट शिरला कार्यालयात
स्थानकालगत फेरीवाले
एलीफिस्टन रोड रेल्वे स्थानकात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकालगत शंभर ते दीडशे मीटर पर्यंत फेरीवाले बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र नायगाव रेल्वे स्थानकालगत पूर्वेच्या भागात सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक अनधिकृत दुकाने रेल्वे स्थानकाच्या १०० मीटर परिसराच्या आत व जवळ बांधून ठेवली आहेत. याचा अडथळा प्रवाशांना ही निर्माण होत आहे. या फेरीवाल्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने प्रवाशांना येथून धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.