आगीच्या दुर्घटनांत १८ ने घट
कल्पेश भोईर
वसई : मागील काही वर्षांपासून वसई विरार शहरात आगीच्या दुर्घटनांची संख्या कमी होऊ लागली आहे. वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात वर्षभरात ६४१ घटना घडल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत आग लागण्याच्या संख्येत १८ ने घट झाली आहे. असे जरी असले तरी विरारच्या विजयवल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १५ जणांचा होरपळून झालेला मृत्यू ही घटना वर्षभरातील अतिशय दुर्दैवी घटना होती.
वसई विरार शहरात अनेक छोटय़ा-मोठय़ा औद्योगिक वसाहतीत, सदनिका, गोदामे, विद्युत उपकरणे, गॅस गळती, शॉर्टसर्किट यासह इतर ठिकाणी अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडतात. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविले जाते. शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढू लागले आहे. त्याच अनुषंगाने शहरातील विविध ठिकाणी नवीन अग्निशमन उपकेंद्र व अत्याधुनिक स्वरूपाची वाहनेही अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होऊ लागली आहेत. त्या साधनांद्वारे आगीवर नियंत्रण मिळविले जात आहे.
आगीच्या घटना विशेषकरून औद्योगिक वसाहती, गोदामे या ठिकाणच्या भागात अधिक प्रमाणात घडल्या आहेत. तसेच आगीच्या घटनांसह रस्त्यावर ऑइल गळती होण्याच्या ३७ घटना शहरात घडल्या आहेत. १० घरगुती गॅस गळती, वादळी वाऱ्यामुळे शहरात ९८४ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. वस्तीत शिरलेले नाग, धामण, फुरसे, अजगर, मणेर, घोणस अशा प्रजातीचे २ हजार ८१५ साप पकडण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे. आगीच्या घटना शॉर्टसर्किटमुळे अधिक होतात. प्रत्येक आस्थापनांचे विद्युत लेखापरीक्षण करण्याचा सूचना केल्या जात आहेत. अग्निसुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालये, विविध आस्थापना यांची तपासणीही केली जात असल्याचे अग्निशमन दलप्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले आहे.
अग्निशमन दलाकडून नागरिकांना जीवदान
वसई विरार शहरात आगीसह इतरही आपत्तीजनक घटना घडत असतात. यात विशेषत: शहरात निर्माण होणारी पूरस्थिती, आग लागल्यानंतर अडकून पडणे, दलदलीत रुतणे, पाण्यात वाहून जाणे अशा विविध घटनांमध्ये नागरिक अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी १४८ नागरिकांची सुखरूप सुटका करून त्यांना जीवदान दिले आहे, तर दुसरीकडे २२८ पशु-प्राण्यांनाही यातून सुरक्षित बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले आहेत.
वर्षभरातील प्रमुख घटना
- करोनाकाळात २३ एप्रिलच्या रात्रीच्या सुमारास विरार येथील विजयवल्लभ या करोना उपचार रुग्णालयाला भीषण आग लागली होती. यात १५ करोनाबाधितांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
- १२ डिसेंबर रोजी वसई पूर्वेच्या पोमणजवळील साष्टीकर पाडा येथे सौंदर्यप्रसाधने ठेवण्यात आलेल्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत या ठिकाणी कामासाठी असलेले सहा कामगार जखमी झाले होते.