कल्पेश भोईर

वसई: वसई-विरार शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढत आहे. अशा स्थितीत वसई विरार शहराची अग्निसुरक्षेची जबाबदारी ही केवळ २२६ कर्मचाऱ्यांवर आहे. वसई-विरार शहरात वाढत्या आगी, दुर्घटना आणि बचावकार्य यांचे प्रमाण जास्त असून अग्निशमन विभागावर त्याचा तणाव वाढत आहे.

शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढत आहे. विविध ठिकाणी टोलेजंग इमारती, औद्योगिक वसाहती, बैठय़ा चाळी, उपाहारगृह, रुग्णालये यासह इतर आस्थापना विकसित होत आहेत. त्यातच शहरातील अनेक ठिकाणी झालेले अतिक्रमण , बेकायदा बांधकामे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे बहुतांश परिसर हा दाटीवाटीचा बनला आहे. अशा ठिकाणी आगी लागल्यास बचावकार्य करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. विशेषत: पावसाळय़ात वसई विरार शहरात पूरस्थितीची समस्या निर्माण होत असते. अशा प्रसंगी कर्मचाऱ्यांची  कसरत असते. विविध ठिकाणी माणसे अडकून पडणे, झाडे कोसळणे व इतर दुर्घटना वेळेसही  जवानांना तात्काळ धाव घ्यावी लागते. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे विभागावर ताण पडतो. पालिकेकडून अग्निशमन विभाग अत्याधुनिक करण्यावर भर दिला जात आहे  शहराच्या वाढत्या लोकसंख्ये नुसार पालिकेने शहरात विविध ठिकाणी नवीन उपकेंद्र विकसित करण्याची कामे ही हाती घेतली आहेत.  सध्या स्थितीत  अग्निशमन विभागात २२६ इतके  या कर्मचारी आहे. यातील  १ सहायक अग्निशमन प्रमुख अधिकारी, ४२ वाहन व यंत्रचालक तर १८३ अग्निशामक विमोचक यांचा समावेश आहे. यासर्व मंजूर पदापैकी  ८ कर्मचारी हे कायमस्वरूपी सेवेत आहेत तर इतर २२८ कर्मचारी हे ठेका पद्धतीने काम करीत आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात विकसित होत असलेल्या शहरात अग्निसुरक्षेसाठी अग्निशमन विभागातील मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

प्रमुख ३६ अग्निशमन पदे अजूनही रिक्तच

अग्निशमन विभागात मंजूर पदापैकी  ३६ महत्त्वाची पदे अजूनही रिक्तच आहेत. प्रमुख अग्निशमन अधिकारी १, अग्निशमन केंद्र अधिकारी ७, सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी ७ व  २१ प्रमुख अग्निशमन विमोचन अशी पदे रिक्तच आहेत. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत कर्मचारी कायमस्वरूपी नाही.

पालिकेची उदासीनता

आगीच्या घटनास्थळी पोहचण्यासाठीचे रस्ते अरुंद झाले आहेत.  तर अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या बाजार भरविले जातात त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. आपत्कालीन परिस्थितीत सहज पोहचू शकतील अशी व्यवस्था तयार करणे आवश्यक आहे. तसेच रस्त्याच्या मध्ये असलेले अडथळे दूर करणे गरजेचे आहे. तसे होत नसल्याने यावरून पालिकाही अग्निसुरक्षेच्या दृष्टीने उदासीन आहे.

Story img Loader