वसई : विरारजवळील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याजवळ मुद्देमालात जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली असून या आगीत १२ चारचाकी वाहने जळून खाक झाली आहेत.
विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा सागरी पोलीस ठाणे आहे. विविध गुन्ह्यांत व अपघातावेळी जप्त करण्यात आलेली वाहने पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस उभी करून ठेवली होती. सोमवारी सकाळच्या सुमारास अचानकपणे वाहनांना आग लागली. वाहनांच्या टायरने अधिक पेट घेतल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली होती.
या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी दोन अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीत गुन्ह्यात व अपघातात जप्त केलेली १२ चारचाकी वाहने जळून खाक झाली आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. प्रताप घरत, तेजस पाटील, पनिष सातवी, स्वप्नील पाटील व त्यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली.