नालासोपाऱ्यात मद्यधुंद अवस्थेत एक मद्यपी चार मजली इमारती चढून स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.त्याला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.नालासोपारा पश्चिमेच्या भागात बबली अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सोमवारी सकाळी मद्यपान करून एक व्यक्ती चढला होता. तो बराचवेळ त्या ठिकाणी धोकादायक अवस्थेत बसून राहिला होता. याशिवाय अधूनमधून स्टंटबाजी देखील सुरू होती.
त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. कोणत्याही क्षणी खाली कोसळून दुर्घटना होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात होती.या भागातील स्थानिकांनी तातडीने याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना व नालासोपारा पोलिसांना दिली होती.
माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. संजय घायाळ (४५) असे या व्यक्तीचे नाव असून तो वसईच्या साखरपाडा या भागात राहत असल्याचे सांगण्यात आले आहे.नालासोपारा पोलिसांनी या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. त्याला त्याच्या नातेवाईकांकडे सोपविले आहे. सदरची कामगिरी अग्निशमन दलाचे जवान पुरुषोत्तम मकवाना, बस्त्याव तुस्कानो, योगेश म्हात्रे, निखिल भोईर व नालासोपारा पोलिसांनी यशस्वी पार पाडली.