वसई : वालीव पोलीस ठाण्याचे विभाजन करून नायगाव हे नवीन पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे. यासाठी राज्यातील अनुकंपा तत्त्वावरील ८५ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे पोलीस ठाणे पुढील महिन्यातच सुरू केले जाणार आहे. आयुक्तालयातील हे १७ वे पोलीस ठाणे ठरणार आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० रोजी झाली. ठाणे ग्रामीण आणि पालघरचे विभाजन करून हे आयुक्तालय तयार करण्यात आले होते. त्यावेळी एकूण ११ पोलीस ठाणी कार्यरत होती. तर मांडवी, नायगाव, पेल्हार, आचोळ आणि बोळींज या ५ नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव होता. त्यापैकी दोन वर्षांत मांडवी, पेल्हार आणि आचोळे या तीन नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून बोळिंज पोलीस ठाणे तयार केले जाणार होते. मात्र आता बोिळजऐवजी नायगाव पोलीस ठाणे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वालीव पोलीस ठाण्याचे विभाजन करून हे पोलीस ठाणे तयार केले जाणार आहे. नायगाव शहरातील हे पहिले पोलीस ठाणे आणि आयुक्तालयातील १७ वे पोलीस ठाणे ठरणार आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले की, वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्यांची संख्या जास्त असल्याने तेथील ठाण्यावर तणाव येत आहे. त्यामुळे बोिळजऐवजी आम्ही नायगावला प्राधान्य दिले आहे. जागा बघण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
अनुकंपा तत्त्वावर ८५ जणांची पोलीस दलात नियुक्ती
पोलीस आयुक्तालयाला कर्मचाऱ्यांची कमतरता भेडसावत होती. राज्यभरात ज्या ठिकाणी अनुकंपा तत्त्वावर नोकर भरती प्रलंबित होती त्यांची माहिती घेऊन त्यांना मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट केले जाणार आहे. अशा ८५ जणांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व कर्मचारी पुढील महिन्यात दाखल होतील. त्यानंतर इतर पोलीस ठाण्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली नायगाव पोलीस ठाण्यात करून नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार आहे.
आयुक्तालयांतर्गत
पोलीस ठाणी
परिमंडळ-१
नवघर
मीरा रोड
नया नगर
उत्तन
भाईंदर
काशिमारी
परिमंडळ २ आणि ३
वसई
माणिकपूर
वालीव
तुळींज
नालासोपारा
अर्नाळा
विरार
पेल्हार
आचोळे
मांडवी