वसई:  वसई तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप मुकणे यांना लाच प्रकरणात अटक झाल्यानंतर महसूल खात्यातील भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. मागील दीड वर्षांत वसई महसूल खात्यातील एक नायब तहसीलदार, दोन तलाठी व दोन मंडळ अधिकारी असे पाच जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळय़ात अडकले आहेत. यामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अधिकाऱ्यांच्या अटकेनंतर रिक्त झालेल्या जागा न भरण्यात आल्याने कामकाजावर परिणाम होत आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महसूल विभागातील अनेक तक्रारी नागरिकांकडून येत असतात. सातत्याने अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. वसई तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप मुकणे आणि मंडल अधिकारी संजय सोनावणे यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच अटक केली आहे. मागील दीड वर्षांच्या कालावधीमध्ये वसई महसूल कार्यालयातील ५ अधिकारी आणि कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात सापडले आहेत.

वसई तहसीलदार कार्यालय ओस

वसई महसूल खात्यातील या पाच अधिकाऱ्यांबरोबर एक नायब तहसीलदार निवृत्त झाला आहे. त्यामुळे एकूण सहा जागा रिक्त झालेल्या आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. सध्या महाविद्यालयीन प्रवेशाची धावपळ सुरू आहे. अशा वेळा विविध शासकीय दाखले मिळवताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वसई तहसीलदार कार्यालय ओस पडले आहे. अधिकारी नसल्यामुळे कामावर परिणाम होत आहे. शासनाने या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी तसेच या रिक्त जागा भराव्यात,  अशी मागणी वसई युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी केली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five bribe takers arrested in vasai in one and half year zws
Show comments