कल्पेश भोईर
वसई : वसई- विरारमधील पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पाच ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. यासाठीचे केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम’ या योजनेंतर्गत निधी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.
वसई-विरारमध्ये पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे नायगाव, वसई अंबाडी, नालासोपारा आणि विरार असे चार उड्डाणपूल आहेत. परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरांतर्गत असलेले रस्ते अपुरे पडत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. तर, वसईतून मुंबईला जाण्यासाठी वळसा घालून प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ व इंधन या दोन्ही गोष्टी वाया जात आहेत.
या दळणवळणाची सुविधा अधिकच सुलभ व्हावी यासाठी महापालिकेने शहरात पूर्व व पश्चिमेला जे रस्ते जोडले जाऊ शकतात याबाबत सर्वेक्षण करून पाच ठिकाणी नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम’ या योजनेंतर्गत आणि एमएमआरडीएमार्फत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील विराट नगर, ओस्वाल नगरी, अलकापुरी, उमेळमान आणि वसई रोड जुना या ठिकाणी हे उड्डाण पूल बांधण्यात येणार आहेत. सुमारे २५० कोटींहून अधिक निधीची आवश्यकता असल्याचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी सांगितले आहे.
जुन्या अंबाडी पुलाचा समावेश..
वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंबाडी पूल १४० वर्षे जुना पूल आहे. त्यामुळे तो जीर्ण होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. सद्य:स्थितीत त्याचा वापर केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी करण्यात येतो. नव्याने प्रस्तावित केलेल्या पुलांमध्ये जुन्या अंबाडी पुलाचा समावेश करण्यात आला आहे.
रेल्वे उड्डाण पूल बांधण्यासाठी प्रस्ताव तयार केले आहेत. या बांधकामांसाठी निधी मंजूर व्हावा यासाठी शासनाकडे मंजुरीसाठी ते पाठविण्यात आले आहेत. या उड्डाण पुलांमुळे शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. – राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग महापालिका