वसई- नालासोपारा पश्चिमेच्या निळेमोरे गावातील दरवर्षी निर्माण होणार्या पूरपरिस्थितीवर अखेर तोडगा निघाला आहे. येथील रेल्वेच्या ५ एकर जागेवर धारण तलाव तयार करून त्याचे सुशोभिकरण करण्याच्या निर्णयाला केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
नालासोपारा पश्चिमेला रेल्वे स्थानकाला लागून निळेगावात वसलेले आहे. या गावाच्या वेशीवर रेल्वेच्या दगडखाणीची सुमारे ५ एकर जागा आहे. मात्र आता ही दगडखाण वापरात नाही. परंतु हीच जागा गावाच्या पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. दरवर्षी पुराचे पाणी ३ ते ४ फूट घरांमध्ये शिरून नागरिकांच्या मालमत्तेचे आर्थिक नुकसान होत असते. पूराचे पाणि निळेगावापासून श्रीप्रस्थ परिसरातपर्यंत साचून राहते. हे साचलेले पाणी चार-पाच दिवस उतरत नाही. त्यामुळे रोगराई पसरत असते. या भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने रेल्वे रुळांवर पाणी साचून रेल्वे सेवा देखील विस्कळीत होत असते. हा परिसर रेल्वेच्या अखत्यारित येतो. तेथून पावसाचे पाणी गावात शिरत असते. त्यामुळे या दगडखाणी परिसरात धारण तलाव तयार करावा अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती.
हेही वाचा – वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
वसई विरार महापालिकेने रेल्वे मंत्रालयाबरोबर पाठपुरावा करून दोन वर्षांपूर्वी तात्पुरता तोडगा म्हणून साडेपाच कोटी रुपये खर्चून तलाव बांधला होता. त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला होता. पूर्ण समस्या सुटली नव्हती. खासदार डॉ हेमंत सवरा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ही समस्या मांडली. येथील स्थानिकांचा हा गंभीर प्रश्न होता. मला त्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांनी कामाला परवानगी देण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती खासदार डॉ सवरा यांनी दिली.
या परिसरात पावसाचे पाणी साठविण्यासाठी धारण तलावाची आवश्यकता होती. परंतु जागा रेल्वेची असल्याने पालिकेला काम करता येत नव्हते. आता रेल्वेची परवानगी देण्याचे आश्वसान रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे. यामुळे येथील अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटणार आहे, असे स्थानिक रहिवाशी आणि भाजप ओबीसी सेलचे पालघर जिल्हाध्यक्ष निलेश राणे यांनी सांगितले.