सखल भागात पाणी साचले; नालेसफाई अपूर्ण असल्याचा परिणाम

वसई : तौक्ते चक्रीवादळात झालेल्या पावसानंतर आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाने वसई— विरार शहरात हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरल्याने विविध ठिकाणच्या सखल भागात पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. तर काही ठिकाणच्या भागात पालिकेची नालेसफाई न झाल्याने पाणी तुंबून राहिले.

भारतीय हवामान खात्याने ९ ते १२ जून या दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे वसईकरांना पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सकाळपासूनच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली.  जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे  पालिकेच्या अर्धवट नालेसफाईची पोलखोल झाली.

या झालेल्या पावसात वसईतील अनेक रस्ते जलमय झाले. यात वसईतील सगरशेत पेट्रोल पंप मुख्य रस्ता, मूळगाव व सगरशेत रस्ता, मूळगाव सातमा देवी रस्ता, दिवाणमान, नायगाव पूर्व परिसर, नालासोपारा येथील सोपारा निर्मळ मुख्य रस्ता,नालासोपारा पूर्वेतील स्टेशन परिसर ,तुळिंज, आचोळे रोड, चंदननाका, सेंट्रल पार्क, तर विरार येथील अनेक ठिकाणचे रस्तेही पाण्याखाली गेले होते. यामुळे नागरी जीवन विस्कळीत झाले झाले होते. यामुळे वाहनांना व नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली.

शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होऊ लागल्याने शहर नियोजन व पालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वसई विरार भागात पावसाच्या जोर वाढला तरी तात्काळ पूरस्थिती निर्माण होऊ लागल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त होऊ लागली आहे. त्यातच यंदाच्या वर्षी पालिकेकडून करण्यात येणारी नालेसफाई ही अर्धवट राहिली आहे. पाणी निचरा होण्याचे मार्गातील गाळ व इतर कचराच काढला नसल्याने पाणी जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे अनेक ठिकाणच्या भागात पाणी तुंबून राहिले आहे. या पाण्यातूनच नागरिकांना प्रवास करावा लागला. या पाण्यात वाहने बंद पडू लागली असल्याने वाहनांना धक्का मारावा लागत आहे. तर काही भागात पाणी भरल्याने सामानांची उचल ठेव करावी लागली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

Story img Loader