वसई: वसईतील धान्याचा काळाबाजार करणार्या ५ शिधावाटप दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले होते. त्यामुळे महिना भरापासून शिधा लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागत होते. आता ही पाच ही दुकाने अन्य शिधावाटप केंद्रात वर्ग करून धान्याचे सुरळीत वितरण सुरू करण्यात आले आहे.त्यामुळे जवळपास २ हजार ६१८ इतक्या शिधापत्रिका धारकांना दिलासा मिळाला आहे.
वसई विरार शहरात पुरवठा विभागाकडून धान्याचे वितरण केले जाते. मात्र शिधावाटपात काळा बाजार होत असल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता. या प्रकारानंतर काळा बाजार करणाऱ्या दुकानांवर गुन्हे दाखल करीत त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यात दोषी आढळून येणाऱ्या
रास्तभाव दुकान चालवणारा आनंद जैस्वाल (उमराळे) श्रमिक महिला बचत गट (माणिकपूर), महालक्ष्मी महिला बचत गट ( माणिकपूर) आदिशक्ती महिला बचत गट (माणिकपूर) सरस्वती महिला बचत गट यांचे परवाने रद्द करण्यात आले होते.
या दुकानांवर कारवाई झाल्याने या शिधा वाटप दुकानातील शिधा वितरण बंद होते. त्यामुळे या शिधा वाटप केंद्रात नोंदणी असलेल्या शिधा लाभार्थ्यांना धान्य मिळत नव्हते. महिना भराचा कालावधी उलटून गेला तरीही धान्य उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांना धान्या पासून वंचित राहावे लागत होते.
याबाबत पालघर येथे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात ही भाजपाचे वसई शहर मंडळ अध्यक्ष महेश सरवणकर यांनी तक्रार दाखल केली होती.
धान्य दुकाने बंद झाली असली तरी त्यात नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांचे धान्य त्यांना वेळेत मिळणे आवश्यक आहे. मात्र अधिकारी वर्गाच्या दिरंगाई मुळे होत अजूनही वितरण झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ही त्यांनी पालकमंत्री यांच्याकडे केली होती.
आता वसईच्या पुरवठा विभागाने ज्यांचे परवाने रद्द झाले आहेत अशी दुकाने तात्पुरता स्वरूपात अन्य दुकानांना जोडून त्यात समाविष्ट असलेल्या शिधा लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.
वसईत ज्या शिधावाटप दुकाने रद्द केली होती. त्यात तालुक्यातील २ हजार ६१८ इतक्या शिधापत्रिका लाभार्थ्यांची नोंद होती. त्यांना अन्य दुकानात वर्ग करून धान्य दिले जात असल्याचे पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांनी सांगितले आहे.
तात्पुरता वर्ग केलेली दुकाने
रद्द वर्ग दुकान
आदिशक्ती महिला बचत गट- दुकान त्रिभुवन दुबे दिवाणमान
जगदंब महिला बचत गट- आदर्श सेवा सोसायटी चुळणे
श्रमिक महिला बचत गट – शिवकुमारी सिंग माणिकपूर
सरस्वती महिला बचत गट- आई जीवदानी महिला बचत गट माणिकपूर
आनंद जयस्वाल – स्वदेशी महिला बचत गट सोपारा
महालक्ष्मी महिला बचत गट- मेहबूब मुन्नी माणिकपूर
दुकाने बंद होती त्यामुळे लाभार्थ्यांना धान्य मिळत नव्हते त्यांना धान्य देण्यास सुरुवात झाली आहे. जो काही धान्य देणे बाकी आहे ते सर्व धान्य त्या लाभार्थ्यांना दिले जाईल. : भागवत सोनार, पुरवठा अधिकारी वसई