वसई : करोना प्रतिबंधासाठी नाकावाटे दिल्या जाणाऱ्या इन्कोव्हॅक लशींकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. पालिकेने सर्व आरोग्य केंद्रांत ६० वर्षांवरील नागरिकांना या लशी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र आतापर्यंत केवळ ४ जणांनीच या लशी घेतल्या आहेत. गेल्या महिन्यापासून करोनाने पुन्हा डोके वर काढले होते. त्यामुळे शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. नागरिकांना आता नाकावाटे घेणारी इन्कोव्हॅक लस देण्यात येते. नाकांमध्ये प्रत्येकी ०.५ एमएलचे ४ थेंब टाकण्यात येतात.

सध्या ६० वर्षांवरील नागरिकांना या लशी देण्यात येत आहेत. शहरात ६० वर्षांवरील १ लाख ६५ हजार नागरिक या लशींसाठी पात्र आहेत.  आतापर्यंत ४ जणांनीच या लशी घेतल्याची माहिती  मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिली.  वर्धक (बुस्टर डोस) मात्रादेखील केवळ दोन लाख ५८ हजार ४५७ जणांनी म्हणजे २२ टक्के लोकांनी घेतला होता. करोनाची तीव्रता कमी असली तरी नागरिकांना या लशी घेणे आवश्यक आहे. पालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रात या लशी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या लशी घ्याव्यात असे आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी केले आहे.

Story img Loader