वसई: वनविभागाच्या वसई गोखिवरे रेंजनाका वाघराळ बिट परिमंडळ कार्यालयातील वनपाल व वनरक्षक या दोन कर्मचाऱ्यांना १ लाख ३० हजारांच्या लाच प्रकरणी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

वनरक्षक पन्नालाल बेलदार (३५) आणि वनपाल पंकज सनेर (४५) अशी अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्या मालकीची मुंबई-अहमदाबाद महामार्गावर समांतर चाळ आहे. सदर चाळीतील खोल्यांना महामार्गाच्या विरुध्द बाजूने दरवाजे आहेत. तक्रारदार यांनी या चाळीतील खोल्यांना येण्याजाण्याच्या सोयीसाठी महामार्गाच्या दिशेने दरवाजा काढण्याचे काम सुरु केले होते.

हेही वाचा >>> पोलिसांकडूनच तरुणीचा विनयभंग, अपहरणाचा प्रयत्न; नागरिकांनी पोलिसांना चोपले, वसईतील दोन पोलीस निलंबित

यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराला कार्यालयात बोलावून महामार्गाची बाजू ही वन विभागाची हद्द असून त्या बाजूला दरवाजे काढले असल्याने त्यांना वन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल अशी धमकी दिली होती.  त्यावेळी तक्रारदाराने कारवाई न करण्याची विनंती केली. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी प्रत्येक खोलीमागे ८० हजार रुपये अशी ३ खोल्यांसाठी लाचेची मागणी केली होती. कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराने रकमेपैकी ९० हजार रुपये १६ सप्टेंबरला दिले. उर्वरित पैशांसाठी २५ सप्टेंबर पर्यंत मुदत मागितली होती. मात्र वनकर्मचाऱ्यांनी पैशांसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने पालघरच्या लाचलुचपत विभागात तक्रार केली.

हेही वाचा >>> वसईतील खदाणी धोकादायक! वसई नवजीवन येथील खदाणीत दोन मुलांचा बुडून मृत्यू

या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने गोखिवरेच्या रेंज नाका येथील वनविभागाच्या कार्यालयात सापळा रचून  वनरक्षक पन्नालाल याला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.त्यानंतर वनपाल पंकज सनेर यालाही अटक केले आहे.पडताळणीत दोघांनी ९० हजार रुपये स्विकारले असून उर्वरित रक्कम तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी सांगितले आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.