वसई: वसईचे माजी आमदार तथा जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉमनिक घोन्सालविस यांचे रविवारी बंगली येथील राहत्या घरी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ९३ वर्षे होते. त्यांच्या पश्चात ॲलन,युरी,आणि रोहन अशी तीन मुले,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पंचायत समिती सदस्य (१९७० ते १९७२) १३ वर्ष ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य तर १९८५ ते १९९० या कालावधीत वसई मतदारसंघाचे आमदार म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.
हेही वाचा >>> वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
आमदारकीच्या काळात विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले. याशिवाय बंगली सोसायटीचे संस्थापक संचालक, बँसीन कॅथॉलिक बँकेचे सचालक, खरेदी-विक्री संघाचे संस्थापक अध्यक्ष, पान मार्केटिंग सोसायटीचे चेअरमन (१९६७ ते २००६) ,कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटलचे विश्वस्त, वसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, पिगरी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, साधना भांडारचे संस्थापक, साधना सहकारी पतपेढीचे संस्थापक, म. बि. कुलकर्णी ट्रस्टचे अध्यक्ष, पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ,लोकसेवा मंडळाचे सचिव अशी विविध पदे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात भूषविली. घोन्साल्विस यांच्यावर सोमवारी सकाळी ९. ३० वाजता सांडोर येथील सेंट थॉमस चर्च येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे घोन्साल्विस यांच्या निधनाबद्दल राजकीय,सामाजिक आणि सहकार क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.