वसई : एका बांधकाम व्यावसायिकाकडे १० कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई विरार महापालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्निल बांदेकर यांच्यासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री खंडणीच्या रकमेतील १५ लाखांचा पहिला हफ्ता घेताना सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२), ३०८ (३) ३०८ (४), ३५२, ३५१(२) ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बांधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता (३४) यांचा वरळीत झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाविरोधात शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक स्वप्निल बांदेकर यांनी विविध ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. हे प्रकरण मिटविण्यासाठी बांदेकर यांनी १० कोटींची खंडणी मागितली होती. नंतर तडजोड होऊन खंडणीची रक्कम दीड कोटी रुपये ठरली. त्या खंडणीच्या रकमेतील १५ लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी बांदेकरच्या वतीने हिमांश शहा (४५) आला होता. शनिवारी रात्री मिरा रोड येथील बनाना लिफ हॉटेलमध्ये नवघर पोलिसांनी सापळा लावून शहा याला अटक केली. त्यानंतर नालासोपारा येथून माजी नगरसेवक स्वप्निल बांदेकर तसेच त्याचे अन्य दोन साथीदार किशोर काजरेकर आणि निखिल बोलार यांना अटक केली, अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर यांनी दिली.
५ फेब्रुवारीपर्यंत कोठडी
सर्व आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. स्वप्निल बांदेकर हे वसई विरार महापालिकेत २०१५ ते २०२० या काळात शिवेसनेचे नगरसेवक होते. शिवसेनेच्या बंडानंतर ते ठाकरे गटातच राहिले.
प्रकरण काय?
मुंबईत राहणारे तक्रारदार आकाश गुप्ता (३४) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. गुप्ता यांच्या कंपनीत हिमांशू शहा (४५) हा भागीदार आहे. गुप्ता यांच्या चिंतहररस चिंतपुरणी एलएलपी रिॲल्टर्स कंपनीला वरळी आदर्शनगर येथील दर्शन सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम मिळाले आहे.
– या प्रकल्पाविरोधात बांदेकर यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी शहा याने बांदेकर याला तक्रारी मागे घेण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले. २२ ऑक्टोबर २०२४ रोजी माटुंगा येथील एका कॅफेत स्वप्निल बांदेकर, हिमांशू शहा, किशोर आणि आकाश गुप्ता यांची पहिली बैठक झाली. त्यावेळी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. अन्यथा जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीड कोटीमध्ये तडजोड झाली. – नोव्हेंबर २०२४ आणि डिसेंबर २०२४ मध्ये दर महिन्याला २५ लाख तर जानेवारी २०२५ पासून ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रति महिना १० लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र गुप्ता पैसे देण्यास असमर्थ ठरल्याने त्यांना धमकावण्यात येत होते. अखेर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.