कल्पेश भोईर
वसई : शिधापत्रिकेवर लाभ घेणाऱ्या काही शिधा धारकांची नावे मूळ गावी व स्थलांतरित ठिकाणी अशा दोन्ही ठिकाणी असल्याने दोन्ही ठिकाणी लाभ घेत होते. केवळ एकाच ठिकाणी लाभ घेण्यात यावा यासाठी पुरवठा विभागाने शोधमोहीम सुरू केली होती. यात आतापर्यंत ४ हजार १५५ इतक्या दुहेरी शिधा लाभार्थी सापडले असून त्यांची नावे रद्द केली जाणार आहेत. या लाभार्थीना कोणत्यातरी एकाच ठिकाणी धान्याची उचल करता येईल.
अन्नपुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण केले जाते. गरजूंना याचा अधिक लाभ मिळावा यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने पुरवठा विभागाकडून ‘डी डुप्लिकेशन’ या अंतर्गत मूळ गावी व स्थलांतर करून आलेल्या ठिकाण अशा दोन्ही ठिकाणी लाभ घेणाऱ्या दुहेरी धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. वसईतही शासनस्तरावरून जाहीर करण्यात आलेल्या यादीत ११ हजारांहून अधिक लाभार्थी दुहेरी शिधाचा लाभ घेत असल्याचे उघड झाले होते. पुरवठा विभागाने मिळालेल्या यादी नुसार या लाभार्थीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. या लाभार्थीना केवळ कोणत्या तरी एकाच ठिकाणी धान्याची उचल करता येऊ शकते. यासाठी या लाभार्थ्यांकडून जोडपत्र व अर्ज भरून घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत ३ हजार ३९ लाभार्थीनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र इतर दुहेरी लाभार्थीनी अर्ज दाखल न केलेल्या ४ हजार १५५ इतक्या लाभार्थीची नावे रद्द करण्यात येणार असल्याची माहिती वसई तालुका पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे. शोधमोहिमेचे आतापर्यंत ६० टक्के एवढे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. जे दुहेरी लाभ घेणारे लाभार्थी कमी होतील त्याचा लाभ हा वसईतील गरजू लाभार्थीना देता येणार असल्याचे पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांनी सांगितले आहे.
अखेर ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली कार्यान्वित
ऑनलाइन शिधापत्रिका प्रणाली ही सुरुवातीला केवळ महाराष्ट्र राज्यापुरती सीमित होती. त्यामुळे परराज्यातून स्थलांतर करून येणाऱ्या शिधापत्रिका धारक यांची नावे त्या ठिकाणच्या केंद्रात आहेत किंवा नाही याची माहिती मिळत नव्हती. यामुळे दुहेरी शिधा लाभ घेणाऱ्या लाभार्थीची संख्याही वाढत होती. आता ही ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित केल्याने कोणत्या शिधा धारकांचे नाव कोणत्या राज्यात व कोणत्या ठिकाणी आहे. याची माहिती मिळू लागली आहे. यामुळे दुहेरी शिधा लाभार्थीना आवर घालण्यास चांगलीच मदत होणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दुहेरी शिधा लाभार्थीची शोधमोहीम सुरू आहे. जे दुहेरी शिधा लाभार्थी पुढे आले नाहीत अशा जवळपास चार हजारांहून अधिक लाभार्थीची नावे रद्द केली जातील. तर ज्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यांचे अर्ज वरिष्ठांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले जाणार आहेत.
–रोशन कापसे,पुरवठा अधिकारी वसई