वसई- वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली एका भामट्याने वसईतील एका विद्यार्थिनीच्या वडिलांना तब्बल २१ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
फिर्यादी हे वसई पश्चिमेच्या बाभोळा येथे राहतात. त्यांच्या मुलीने हरयाणा येथील वैद्यकीय महाविद्यालायात प्रवेश परीक्षा दिली होती. त्यात ती उत्तीर्ण होऊन प्रतीक्षा यादीत तिचा क्रमांक होता. दरम्यान, मुलीच्या वडिलांना निखिल छगानी नामक व्यक्तीने फोन केला. महाविद्यालयात ओळख असून प्रतीक्षा यादीत असल्याने तुमच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे आश्वासन त्याने दिले. एप्रिल २०२३ ते सप्टेंबर या कालावधीत त्याने प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली मुलीच्या वडिलांकडून २१ लाख ७० हजार रुपये उकळले. हे सर्व पैसे ऑनलाईन देण्यात आले होते. मात्र मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. माणिकपूर पोलिसांनी सोमवारी रात्री याप्रकरणी निखिल छगानी याच्याविरोधात फसवणुकीच्या कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – वसई : सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसचा अपघात, भावाला सोडायला आलेल्या तरुणीचा मृत्यू
आरोपी छगानी हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशांच्या यादीवर लक्ष ठेवून होता. फिर्यादी यांच्या मुलीचा क्रमांक प्रतीक्षा यादीत होता. तेथून नंबर मिळवून त्याने संपर्क केला होता, अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली. आरोपी हा सराईत आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी मुंबईच्या माहीम पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.