वसई– एका वृध्दाला मधुजालात (हनी ट्रॅप) मध्ये अडकून अश्लील चित्रफितीच्या आधारे त्याच्याकडून तब्बल ३४ लाख रुपये उकळल्याचा प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात एका तरूणीसह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नालासोपार्‍याच्या आचोळे परिसरात राहणारे तक्रारदार हे ६९ वर्षांचे असून सेवानिवृत्त आहेत. २८ एप्रिल रोजी त्यांना ‘कुटुंब’ नावाच्या ॲपवरून प्रियांका शर्मा नावाच्या तरुणीने संपर्क साधला होता. प्रियांकाने तक्रारदाराला मधाळ बोलण्यात गुंतवून मधुजालात (हनीट्रॅप) मध्ये अडकवले. तिने स्वत:चा न्यूड व्हिडियो पाठवला आणि तक्रारदाराला देखील आपला न्यूड व्हिडियो पाठविण्यास सांगितले. तिच्या जाळ्यात फसून तक्रारदाराने त्या तरुणीला आपला न्यूड व्हिडियो पाठवला होता. यानंतर मात्र प्रियांकाने तक्रारदाला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली. न्यूड व्हिडियो डिलिट करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील असे तिने सांगितले. घाबरून त्यांनी प्रियांकाचा नंबर डिलीट करून तिला ब्लॉक केले.

हेही वाचा >>>Amol Mitkari : “महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ८५+८५+८५ म्हणजे २७० वाह..”, अजित पवारांच्या पक्षाने उडवली खिल्ली

दिल्ली गुन्हे शाखेच्या नावाने धमकावले..

प्रियांकाचा नंबर ब्लॉक केल्याने हे प्रकरण शांत झाले असे तक्रारदाराला वाटले. मात्र लगेच त्यांना रामकुमार मल्होत्रा नावाच्या इसमाचा फोन आला. दिल्ली गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे त्याने सांगून हे प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची मागणी केली. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत त्यांनी तक्रारदाराकडून ३४ लाख रुपये उकळले. हे पैसे तक्रारदाराने ऑनलाईन आणि आरटीजीएस द्वारे पाठवलेहोते. मात्र तरी देखील या भामट्यांची पैशांची मागणी वाढत होती. अखेर तक्रारदाराने आचोळे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

एप्रिल पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. याप्रकरणी आम्ही प्रियांका शर्मा, रामकुमार मल्होत्रा आणि राहुल शर्मा नावाच्या तीन जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८( ४) ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (सी) (डी) ६७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of 34 lakh rupees by getting caught in a honey trap vasai crime news amy