विरार : वसई-विरार महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीच्या कामात झाडांचे बुंधे डांबराने बंदिस्त केल्याने झाडांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेला आपली चूक लक्षात आली आणि शुक्रवारी पालिकेने डांबराने बंदिस्त झाडांचे बुंधे रस्ते खणून मोकळे केले.
महानगरपालिकेने रस्ते दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. ही कामे करताना ठेकेदाराने चक्क झाडाच्या बुध्यांना डांबराने बंदिस्त केले होते. यामुळे या झाडांना पाणी देण्याची कोणतीही सोय उरली नव्हती. आणि पाणी जरी दिले तरी डांबर असल्याने पाणी जमिनीत मुरणार नाही आणि झाडांच्या मुळांना पाणी मिळणार नसल्याने काही दिवसांतच ही झाडे सुकून मृत पावली असती. ही बाब ‘लोकसत्ता’ ने वृक्ष प्राधिकरण विभाग वसई- विरार महानगरपालिका यांच्या निदर्शनास आणून दिल्याने त्यांनी तातडीने कारवाई करत या झाडांच्या बुंध्याचे डांबर काढून टाकले.

Story img Loader