वसई : नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा वाकीपाडा परिसरात असलेल्या पाझर तलावाचा बंधारा कमकुवत झाला आहे. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेमार्फत ४७ लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच त्याच्या दुरुस्ती व डागडुजी करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.
नायगाव पूर्वेतील जूचंद्र, चंद्रपाडा, वाकीपाडा या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाझर तलाव तयार करण्यात आला आहे. हा तलाव जुना असल्याने तो काही ठिकाणी खचू लागला आहे. विशेषत: पाझर तलावाच्या बंधाऱ्यांवर झाडेझुडपे उगवली आहेत. त्यांची मुळे थेट पिचिंग करण्यात आलेल्या दगडांत आणि मातीत जात असल्याने हा बंधारा खचू लागला असल्याचे निदर्शनास आले होते. मागील वर्षी लघुपाटबंधारे विभागाने याची पाहणी केली होती.
वाढत्या लोकसंख्येमुळे या तलावातील पाण्याचा वापर वाढला होता. शिवाय तो खचूही लागल्याने हा तलाव लवकर आटून जात होता. सध्याही तीच परिस्थिती असल्याने वाकीपाडा-चंद्रपाडा येथील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. चंद्रपाडा-वाकीपाडा विभागाच्या लोकसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्याने पाझर तलावातील पाणीसाठा अपुरा पडत असल्याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तसेच तलावाच्या पाणी पातळीत वाढ करण्यासाठी तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी यांनी केली होती. तसे लेखी पत्र त्यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे दिले होते.
सदर तलावाच्या कमकुवत झालेल्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी त्यात करण्यात आली होती. या मागणीनुसार आता पाझर तलावाच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
बंधाऱ्याची डागडुजी आवश्यक
पाझर तलावातील पाण्याची साठवणूक योग्य पद्धतीने व्हावी यासाठी जवळपास ६०० मीटर लांबीचा बंधारा तयार केला आहे. परंतु या बंधाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात झाडेझुडपे उगवली आहे. ही झाडेझुडपे वेळच्यावेळी काढून टाकणे गरजेचे होते.परंतु तसे होत नसल्याने या झाडांची मुळे आता थेट बंधाऱ्यात पसरू लागली आहेत. त्यामुळे तो खचत आहे. आधी बंधाऱ्यावर उगवलेली छोटी झाडेझुडपे बाजूला करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा