वसई : स्कीमर या उपकरणाद्वारे एटीएम कार्ड क्लोन करून बॅंक खात्यातून लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या एका टोळीला माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून स्कीमर आणि एटीएम कार्ड क्लोन करणारी यंत्रे आणि १०३ एटीएम कार्ड जप्त केली आहेत. विविध एटीएम केंद्रे, हॉटेल, पेट्रोल पंप आदी ठिकाणांवरून स्कीमरद्वारे ग्राहकांचे एटीएम कार्ड क्लोन करून ही टोळी बनावट कार्ड तयार करत असे. त्याद्वारे बँक खात्यातून रकमेची लूट होत असे.
गेल्या काही दिवसांपासून बॅंक खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. एटीएम कार्डाची चोरी झाली नसतानाही एटीएम कार्डद्वारेच हे पैसे काढण्यात येत होते. या प्रकरणी स्कीमरद्वारे बनावट एटीएम कार्ड तयार करून पैशांचा अपहार केला जात असल्याचा संशय पोलिसांना होता.
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी अधिक माहिती मिळवून तपास करत विरारमधून सौरभ यादव याला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान टोळीतील इतर सदस्यांची माहिती मिळवून पोलिसांनी धनराज पासवान, पवनकुमार पासवान आणि राकेश चौधरी या त्याच्या तीन साथीदारांना अटक केली.
फसवणूक कशी होते?
ल्लबॅंकेच्या एटीएम केंद्रात तसेच उपाहारगृह, पेट्रोल पंप आदी ठिकाणी एटीएम कार्ड वापरले जाते. येथे या टोळक्याने गुपचूप स्कीमर यंत्र बसवले होते. त्यामुळे ग्राहकाने कार्ड यंत्रात टाकल्यानंतर स्कीमरद्वारे कार्डाची माहिती चोरी होत असे. या माहितीच्या आधारे ही टोळी बनावट एटीएम कार्ड तयार करत असे. कार्ड स्वाईप करताना आरोपी ग्राहकाच्या नकळत कार्डचा पिन कोड चोरी करून घेत असत. त्यानंतर बनावट कार्डच्या आधारे अन्य ठिकाणच्या एटीएम केंद्रातून पैसे काढले जात होते, अशी माहिती परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी दिली. स्कीमर यंत्र बाजारात १५ हजार रुपयात मिळते. ते एटीएम केंद्रातील यंत्रात अवघ्या एका मिनिटात लावण्यात येत होते.
ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस उपनिरीक्षक रोहिणी डोके, शैलेश पाटील, शामेश चंदनशिवे, धनंजय चौधरी आदींच्या पथकाने केली.