वसई– मागील ५ वर्षांपासून उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात असेलल्या सुभाषसिंग ठाकूर याची रवानगी अखेर उत्तरप्रदेशीतील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. यामुळे नालासोपारा येथील समय चौहान हत्याकांडात सुभाषसिंग ठाकूर याला वसईत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरार मध्ये राहणार्‍या समय चौहान या चाळ बिल्डरची २६ फेब्रुवारी २०२२ रोजी विरारच्या मनवेलपाडा येथे भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन आणि सध्या उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असणारा गॅंगस्टर सुभाष सिंग ठाकूर यांच्या सांगण्यावरून ही हत्या झाली होती. या गुन्हयात सुभाष सिंग ठाकूर मुख्य आरोपी आहे. हे प्रकरण संघटित गुन्हेगारीचे असल्याने सर्व आरोपींवर आत मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सुभाषसिंग ठाकूर याला वसईत आणण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली होती. तसे पत्र वाराणसीच्या तुरुंगाधिकार्‍यांना आणि न्यायालयात सादर करण्यात आले होते. मात्र सुभाषसिंग ठाकूर उपचाराच्या नावाखाली रुग्णालयात असल्याने गुन्हे शाखेला त्याला वसईत आणता आले नव्हते.

५ वर्षानंतर रुग्णालयातून कारागृहात

सुभाषसिंग ठाकूर याला जेजे हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०१९ मध्ये त्याने आजारी असल्याचे सांगितल्याने त्याची रवानगी बनारस हिंदू विद्यापीठाच्या सर सुंदरलाल रुग्णालयात रुग्णालायत करण्यात आली होती. मागील ५ वर्षांपासून तो रुग्णालयात उपचार घेत होते. रुग्णालयात असताना तो गुन्हेगारी कारवायांची सुत्रे हलवत होतो. तेथेच त्याचा दरबार भरत होता. दरम्यान उत्तर प्रदेशाचे कारागृह पोलीस महानिरीक्षक पीव्ही रामशास्त्री यांनी पोलीस आयुक्तांना सुभाषसिंग ठाकूर याच्या प्रकृतीबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार १२ तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पाहणी करून सुभाषसिंग ठाकूर ठणठणीत असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर ठाकूर याची रवानीग फतेहगढ मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

अनेक गुन्हे उलगडण्याची शक्यता

वसई विरार शहरात असलेल्या गुन्हेगारांना सुभाषसिंग ठाकूर याचा आश्रय असल्याचे सांगण्यात येते. किंबहुना अनेक गुन्हेगारी कारवाया या सुभाषसिंग ठाकूर याच्या सांगण्यावरून होत असतात. समय चौहान प्रकरणात सुभाषसिंग ठाकूर आरोपी बनला असल्याने पोलिसांना त्याला वसईत आणून चौकशी करता येणार आहे. या चौकशीत अनेक गंभीर गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gangster subhash singh to bring in vasai in samay chauhan murder case after discharge from hospital zws