वसई : नायगाव स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूच्या भुयारी मार्गाजवळ फेरीवाल्यांकडून कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या कचऱ्यामुळे स्थानकालगतच कचराभूमी तयार होऊ लागली आहे. प्रवाशांना  दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

नायगाव रेल्वे स्थानकाला जोडूनच नायगाव पूर्वेकडील परिसर आहे. या भागात स्थानकालगतच मोठय़ा संख्येने फेरीवाले विविध प्रकारच्या वस्तू, भाजीपाला, खाद्यपदार्थ विक्रीसाठी बसत आहेत. त्यातून दररोज मोठय़ा प्रमाणात कचरा निघतो तो कचरा थेट भुयारी मार्गाजवळ आणून टाकला जाऊ लागला आहे.  भुयारी मार्गाजवळून दररोज मोठय़ा संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.  या ठिकाणी कचरा टाकणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिका व रेल्वे प्रशासन यांच्या मार्फत कोणतीच कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या अधिकच जटिल बनली आहे.  त्यातच फेरीवाल्यांची वाढती संख्या यामुळे कुजलेला भाजीपाला, फळांची आवरणे,  असे विविध प्रकारचे पदार्थ व कचरा या भागात टाकला जाऊ लागला आहे. हा कचरा कुजून त्याची दुर्गंधी हवेद्वारे पसरू लागली आहे. या दुर्गंधीमुळे भुयारी मार्गाजवळ असलेल्या शेडखाली उभे राहता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आतातरी प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन कारवाई करून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

स्वच्छतागृहाचा अभाव

मागील तीन ते चार वर्षांपासून नायगाव स्थानकातील पूर्व भागात स्वच्छतागृह तयार करण्यात येणार होते. मात्र खारभूमी व रेल्वेच्या जागेच्या वादामुळे अजूनही या भागात स्वच्छता गृह तयार झाले नाही. रेल्वेने स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी खड्डेही खणले होते. मात्र त्या खड्डय़ातही आता मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. स्वच्छतागृह नसल्याने नाइलाजाने उघडय़ावर लघुशंका करावी लागत आहे. याची मोठी दुर्गंधी स्थानक परिसरात पसरू लागली आहे. याचा त्रास प्रवाशांना होत आहे.

Story img Loader