वसई – वसई विरार शहरात रविवारी मोठा गाजावाजा करून एक तारीख एक तास हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात नेत्यांपासून अधिकार्‍यापर्यंत सर्वांनी हातात झाडू घेऊन फोटोसेशनही करवून घेतले. मात्र हे अभियान संपताच शहराची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आली. जागोजागी कचर्‍याचे ढिग पडलेले. यामुळे हे अभियान दिखावा ठरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी वसई विरार शहरात एक तारीख एक तास ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्थानक परिसर, तलाव परिसर, रस्ते, धार्मिक स्थळे, समुद्र किनारे, शासकीय ठिकाणे, अतिकचरा असलेली ठिकाणे, बाजार पेठा ९७ ठिकाणी स्वच्छता मोहीम घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या स्वच्छता मोहिमेत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, बचत गट, राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक अशा १७ हजार ४३८ जणांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. या मोहिमेत एकूण २ लाख ३७ हजार ९९८ चौरस मीटर इतक्या परिसराची आणि ४० हजार ३५३ मीटर पर्यंतचे रस्ते स्वच्छ केल्याचा दावा करण्यात आला होता.

हेही वाचा – वसई : टॅकरची वाहनाला धडक दिल्याने वाद, चौघांनी केलेल्या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू

मात्र सोमवारी याच्या विपरित चित्र शहरात पहायला मिळाले. जागोजागी कचरा साठलेला दिसून आला. रस्त्याच्या कडेला, नाक्यावर कचरा टाकण्यात आला होता. ज्या ठिकाणी रविवारी स्वच्छता करण्यात आली त्या ठिकाणी सोमवारी पुन्हा कचरा साचलेला होता. आयआयटीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात शहरातील ५० टक्के कचरा हा कचराभूमीत (डंपिंग ग्राउंड) न जाता शहरात इतरत्र पडलेला असतो असे नमूद केले होते. शहरात जागोजागी कसा कचरा साचलेला आहे ते सोमवारी दिसून आले.

हेही वाचा – वसई विरार पालिकेच्या नावांची गटारांची झाकणे विक्रीला

शहरातील अनेक भागांत अनधिकृत कचराभूमी तयार झाली आहे. तेथील कचरा कधीच उचलला जात नाही. पालिकेने अशा ठिकाणचा कचरा काढून तो परिसर स्वच्छ केला पाहिजे. फक्त एका दिवसापुरता फोटोसाठी मोहीम हाती घेतल्याने शहर स्वच्छ होणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. नेते आणि अधिकार्‍यांनी फोटो पुरते काम न करता प्रत्यक्ष खर्‍या ठिकाणी जाऊन स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली.

शहरात दररोज कचरा तयार होत असतो. तो पालिकेच्या कर्मचार्‍यांमार्फत उचलला जातो. त्यामुळे मोहीम अपयशी ठरली असे म्हणता येणार नाही, असे पालिकेने सांगितले. ज्या ज्या ठिकाणी कचरा जमा झाला असेल तो स्वच्छ केला जाईल असे पालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

Story img Loader