वसई- वसई पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथे गटाराचे खोदकाम सुरू असताना गॅस गळती झाली. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. परंतु या गॅस गळतीमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. येथील गॅस पुरवठा काही काळ खंडित झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील समर्पण इमारतीसमोर गटाराचे काम सुरू आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता काम करणार्‍या ठेकेदाराच्या कामगारांनी खणायला सुरवात केली. त्या ठिकाणी गुजराथ गॅस कंपनीच्या भूमीगत पाईपलाईन होत्या. मात्र कामगारांना अंदाज न आल्याने गॅस पाईपलाईन फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली.समर्पण इमारतीमध्ये ७० सदननिका आणि १३ दुकाने आहेत. त्यांच्यात एकच खळबळ उडाली. दुकानदारांनी भीतीने दुकाने बंद करून बाहेर पडले. इमरातीचे रहिवाशी देखील इमारती खाली आले होते. रहिवाशांना तात्काळ गुजराथ गॅस कंपनी तसेच पालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण केले. यामुळे इमारतीचा गॅस पुरवठा काही काळ खंडीत झाला होता. येथील रहिवाशांकडे पाईपगॅस शिवाय कसलाच पर्याय नसल्याने दुपारचे जेवणही बनवता आले नाही.

ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबद्दल रहिवाशांनी संताप व्यक्त केला. ठेकेदाराची कर्मचारी सकाळी ११ च्या सुमारास काम करण्यासाठी आले. काही वेळातच गॅस गळती सुरू झाली. ठेकेदाराने गटाराचे काम करताना कसलीच ब्लू प्रिंट आणली नव्हती तसेच या कामाची कुणाला कल्पनाही देण्यात आली नव्हती, असे समर्पण इमारतीचे रहिवाशी विक्रम शुक्ला यांनी सांगितले. येथून जवळच महावितरणाचा रोहीत्र आहे. गॅस गळती झाली पण सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही, असे त्यांनी सांगितले.

द्वारका हॉटेलच्या आठवणी ताज्या

मागील वर्षी ३० एप्रिल रोजी नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील द्वारका हॉटेलमध्ये अशा प्रकारच्या गॅस गळतीमुळे आग लागली होती. या आगीत द्वारका हॉटेलच्या कर्मचार्‍यांसह ७ जण गंभीर जखमी झाले होते. त्या ठिकाणी देखील पालिकेचा ठेकेदार गटाराचे काम करत असताना गुजराथ गॅसची पाईपलाईन फुटली होती. समोरच असलेल्या द्वारका हॉटेलमधील स्वयंपाकघरातील गॅसमुळे स्फोट होऊन आग लागली होती. या घटनेनंतरही पालिकेच्या ठेकेदारांना कसलाच बोध घेतला नसल्याचे या निमित्ताने दिसून आलं.