वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका इमारतीच्या बंद घरात तीन जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. गॅस गळती झाल्यामुळे या तिघांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
वसई पश्चिमेच्या माणिकपूर परिसरातील नौपाडा येथे आशा सदन नावाची दोन मजली इमारत आहे. रविवारी दुपारी या इमारतीमधून एका घरातून गॅसचा वास येऊ लागला होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माणिकपूर पोलिसांनी घराचे दार तोडून उघडले असता तीन तरुणांचे मृतदेह आढळून आले. यापैकी हॉलमध्ये दोन मृतदेह तर एक मृतदेह स्वयंपाकघरात आढळून आला. मृतांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव मोहम्मद आझम असे आहे. मोहम्मद आझम याचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे हे सर्व मयत ३० ते ३५ वयोगटातील आहेत.
हेही वाचा – वसईत वाहतूक पोलिसावर हल्ला; दुचाकीस्वार फरार, पोलिसांकडून शोध सुरू
घरातील गॅस सुरू होता. त्यामुळे गॅस गळतीमुळे तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली. आम्ही घराचा पंचनामा केला आहे. प्रथमदर्शनी कुठलीही गोष्ट संशयास्पद वाटत नाही. गॅस सुरू असल्याचे दिसून आले. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. गॅस सुरू राहिला असावा आणि त्यामुळेच तिघांचा गुदमरून मृत्यू झाला असावा अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी दिली.
मृतांच्या कुटुंबीयांना संपर्क करण्यात आला असून हे सर्व उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. मे महिन्यात ते या इमारतीत भाड्याने राहण्यासाठी आले होते.