सुहास बिऱ्हाडे
स्मशानातील धुराचे प्रदूषण रोखून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने सहा ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या सुरू केल्या. मात्र वर्ष उलटूनही त्या वापराविना पडून आहेत. नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. आजही पारंपरिक पद्धतीनेच अंत्यविधी करण्याची लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न अत्यंत गंभीर होत असून आताच लोकांनी सुरुवात केली नाही तर त्यांचे गंभीर परिणाम पुढील पिढीला नाही तर आपल्यालाच येत्या काही वर्षांत भोगावे लागणार आहे. कारण पर्यावरणाचा प्रश्न हा कायदे करून नाही तर नागरिकांच्या स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या पुढाकाराने सुटणार आहे.
पाऊस उशिरा पडला की लोक अस्वस्थ होतात आणि चिंता व्यक्त होऊ लागते. चर्चा सुरू होते. ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरणाचा ऱ्हास असे शब्द कानी पडू लागतात. पर्यावरणाचे संवर्धन करायला पाहिजे असे सूर उमटू लागलात. पण पाऊस पडला की हे चिंतेचे सूर पाण्यात वाहून जातात आणि पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ सुरू होते. पर्यावरणाचा प्रश्न काही नवीन नाही. फरक एवढाच की तो दिवसेंदिवस अतिगंभीर होऊ लागला आहे. सर्वच प्रकारच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून निसर्गाचे चक्र कोलमडायला लागले आहे. त्याचे दुष्परिणाम आपण दैनंदिन जीवनात विविध प्रकारे बघत असतो. पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे, प्रदूषण कमी झाले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. मात्र ते रोखण्यासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रत्यक्षात आपण काही करायला तयार नसतो.
शासकीय पातळीवर त्याची दखल घेऊन विविध उपाययोजना केल्या जात आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्राकडून राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम (नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम) जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार विविध प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजनांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये पर्यावरणस्नेही वाहनांचा वापर करणे, शहरात हवा शुद्धीकरण यंत्रे बसवणे, मियावाकी उद्याने तयार करणे. जागोजागी पाण्याचे कारंजे बसवणे आदींबरोबर स्मशानातून प्रदूषण रोखण्यासाठी गॅस दाहिन्या बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमांतर्गत महापालिकांना केंद्र शासन अनुदान देत आहे. वसई-विरार महापालिकेला देखील या योजनेंतर्गत ३२ कोटींचा हप्ता मिळाला आहे. त्यानुसार पालिकेने सीएनजी बस घेतल्या असून चार स्मशानभूमीत गॅस दाहिन्या बसविल्या आहेत. वसई पश्चिमेकडील पाचूबंदर, वसई पूर्वेतील नवघर, नालासोपारा पश्चिम येथील समेळपाडा आणि विरार पश्चिमेकडील विराटनगर स्मशानभूमीत या गॅस दाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करताना लाकडे जाळून होणारे प्रदूषण थांबावे, वृक्षतोड बंद व्हावी हा उद्देश त्यामागे आहे. मात्र या गॅस दाहिन्या बसवून वर्ष उलटूनही लोकांनी या गॅस दाहिन्यांकडे पाठ फिरवली आहे. या गॅस दाहिन्या वापराविना पडून आहेत. नागरिकांनी पारंपरिक पद्धतीनेच अंत्यसंस्कार करण्यावर भर दिला आहे. गॅस दाहिन्यांत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.
वसई, विरार शहरात एकूण ९९ स्मशानभूमी आहेत. एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी साधारण साडेचारशे ते पाचशे किलो लाकडे लागतात. त्यामुळे एका मृतदेहासाठी लागणाऱ्या लाकडांसाठी सुमारे अडीच हजार रुपयांचा खर्च होतो. शहरातील स्मशानभूमीत मृतदेहांच्या दहनासाठी महिन्याला सरासरी साडेतीनशे ते चारशे टन एवढी लाकडे लागत असतात. त्यासाठी पालिकेला महिन्याला सरासरी ३० लाख रुपयांचा खर्च येत होता. अंत्यसंस्कारासाठी मोठय़ा प्रमाणावर लाकडांची आवश्यकता भासत असल्याने लाकडांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लाकडांची टंचाई निर्माण झाली आहे. पालिकेने वनविभागाकडून थेट लाकडे विकत घेण्यास सुरुवात केली आहे. परंतु यामुळे पर्यावरणाचा देखील ऱ्हास होऊ लागला आहे
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना लाकडे लागतात आणि धुराचे प्रदूषण होते. जेव्हा या मृतदेहांना अग्नी दिला जातो याचा प्रचंड धूर निघतो. या स्मशानभूमीला धूर वाहून नेणारी चिमणी नसल्याने आणि या स्मशानभूमीची उंची कमी असल्याने धुराचे लोट आसपासच्या इमारती जातात. यामुळे या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना या धुराचा त्रास सहन करावा लागतो. तसेच मृतदेह जळताना दरुगधी इमारतीत पसरत असते. त्यामुळे गॅस दाहिनी हा उत्तम पर्याय आहे. एका गॅस दाहिनीची किंमत सुमारे ३३ लाख रुपये एवढी आहे. गॅस दाहिनीच्या एका सिलेंडरमध्ये तीन मृतदेहांचे दहन होते. एका गॅस सिलेंडरची किंमत अडीचशे रुपये आहे. त्यामुळे मोठी आर्थिक बचत होते. नागरिकांनी पारंपरिक दहनाचा मार्ग सोडून असा गॅस दाहिनीकडे वळण्याची गरज आहे.
जनजागृतीबरोबर कठोर तरतुदींची गरज
केवळ गॅस दाहिन्या बसविल्या म्हणजे पालिकेचे काम संपले असे नाही. गॅस दाहिनीच्या वापरासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. अनेकांना अशा गॅस दाहिन्या आहेत याची माहिती नाही. गेल्या अडीच वर्षांपासून पालिकेत प्रशासक आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. लोकांना गॅस दाहिनेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी पुढाकार घ्यायला हवा. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनीदेखील आपल्या नातेवाईकांचे अंत्यसंस्कार अशा गॅसदाहिनीत करून समाजापुढे आदर्श घालून दिला पाहिजे. स्मशानभूमीत गॅस दाहिन्या आणि लाकडे असे दोन्ही पर्याय असतात. त्यामुळे लोक लाकडांचा पर्याय निवडतात. ज्या ठिकाणी गॅस दाहिन्या आहेत तेथे लाकडांचा पर्याय बंद करायला हवा.
लाकडे पालिकेकडून विनामूल्य दिले जातात ते बंद करून लाकडांची किंमत आकारली जावी जेणेकरून लोक गॅस दाहिनीकडे वळू लागतील. स्मशानातील लाकडे जाळल्याने होणारे धुराचे प्रदूषण गंभीर आहे. या लाकडांसाठी वेगाने वृक्षसंपदा नष्ट होत आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने पुढे येऊन गॅस दाहिनीचा वापर करायला हवा. ही काळाची गरज आहे.