लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : वसई विरार मध्ये यंदाच्या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेतून एक हजाराहून अधिक घरकुल मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या घरकुल लाभार्थ्यांना दर्जेदार घरबांधणी साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे यासाठी महिलांनी पुढाकार घेत ‘घरकुल मार्ट’ सुरू केले आहे. यात लाभार्थ्यांना वाजवी भावात घरबांधणी साहित्य उपलब्ध करून दिला जाणार आहे.

महिला सक्षमीकरण व त्यांच्या रोजगार संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने पंचायत समिती मार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील महिलांनी मिळून घरकुल मार्ट या नावाने दुर्गम भाग असलेल्या भालीवली येथे घरबांधणी साहित्य विक्री सुरू केले आहे. नुकताच घरकुल मार्टचा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. 

यावेळी विस्तार अधिकारी ज्योतिर्मय पाटील, सरपंच दिनेश परेड, उपसरपंच पूर्वा कुडू , ग्रामविकास अधिकारी संजय किणी, सदस्य दयानंद घरत , यशश्री महिला फार्मर प्रोड्युसरच्या भाताणे अध्यक्षा नीता माळवी, माऊली प्रभाग संघ भाताणेच्या अध्यक्षा नीता घरत ,उमेदच्या व्यवस्थापक सुप्रिया लोके, नीलिमा तरे यांच्यासह प्रभागातील महिला व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

वसई तालुक्यात यावर्षी प्रधानमंत्री आवास योजना १ हजार १३१, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान १२५ आणि रमाई आवास योजना यातून ४ अशी एकूण १२६० घरकुले मंजूर झाली आहेत. या लाभार्थ्यांना माफक दरात  एकाच ठिकाणी हे साहित्य मिळावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात पत्रे, सिमेंट, पाईप, अँगल, बेसिन पॉट यासह इतर साहित्याचा समावेश आहे.

इतर बाजार भावा पेक्षा व लाभार्थ्यांला परवडेल अशा भावात या साहित्याची विक्री केली जाणार आहे. यामुळे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना साहित्य उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रदीप डोलारे यांनी सांगितले आहे.  आपल्या भागात जी घरकुले मंजूर झाली आहेत त्यांना आपल्या घरकुल मार्ट मधून साहित्य घेण्याचे आवाहन त्यांनी केले

महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न

महिलांनी गट तयार करून बांधकाम साहित्य विक्रीचे मार्ट सुरू केले आहे. त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. परंतु त्या सोबतच आजही ग्रामीण भागात रब्बी हंगामात विविध प्रकारचे नैसर्गिक रित्या पिकविलेले कडधान्य ही उपलब्ध असते. त्याची अशाच प्रकारे विक्री केल्यास त्यातूनही रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी पंचायत समिती स्तरावरून जे काही सहकार्य करता येईल ते केले जाईल असे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वसईच्या ग्रामीण भागात घरकुल मंजूर झाली आहे. त्यामुळे महिलांच्या संकल्पनेतून घरकुल मार्ट ही संकल्पना पुढे आली आहे. यासाठी पंचायत समितीच्या सहकार्याने घरकुल मार्ट तयार केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना साहित्य मिळेल व महिलांना ही रोजगार उपलब्ध होणार आहे. -प्रदीप डोलारे, प्रभारी गटविकास अधिकारी

यंदाच्या वर्षातील घरकुले

वसई तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरआडणे, अर्नाळा, अर्नाळा किल्ला, भाताने, चंद्रपाडा, कळंब, खार्डी, करंजोन, खानिवडे, खोचिवडे, माजीवली, मेढे, नागले, पारोळ, पोमण, रानगाव, सकवार, सायवन, शिरवली, शिवणसई, टेंभी, तिल्हेर , टोकरे, उसगाव, मालजीपाडा गावातील ग्रामपंचायत क्षेत्रात ही योजना राबविली जात आहे.

२०२४-२५ या वित्तीय वर्षात ग्रामीण भागात पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून १ हजार १५४ इतक्या घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेच्या लाभाकरीता आवश्यक कागदपत्रे मागविली जात आहेत. त्यांची छाननी करून नंतर ते मंजूर केले जात आहेत. आतापर्यंत १ हजार १३३ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर करण्यात आली आहेत.

यात सर्वाधिक घरकुले तिल्हेर मध्ये २१६, भाताने १९५ आणि आडणे भिणार १४६ या हद्दीत मंजूर झाली आहेत अशी माहिती पंचायत समिती वसई विभागाने दिली आहे.