वसई- लग्न मोडल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना विरार येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केल आहे.
पीडित तरुणी भाविका गावड (२३) ही विरार पूर्वेच्या गासकोपरी चंदनसार येथे राहते. ती फार्मासिस्ट असून विरारच्या मनवेलपाडा येथील एका औषध विक्रेत्या दुकानात काम करते. तिचे याच भागात राहणार्या अक्षय पाटील (२४) या तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र तिला पुढे शिक्षण घ्यायचे असल्याने तिने नंतर लग्न करू असे सांगितले. तिच्या कुटुंबियांनी देखील अक्षयला भाविकापासून दूर राहण्यास सांगितले होते. भाविका अक्षयला टाळत होती. त्यामुळे अक्षय संतापला होता.
बुधवारी रात्री त्याने तिला तिच्या मेडिकल दुकानात गाठले आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. तिच्या छातीवर, डाव्या हातावर, डोळ्यावर आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतर अक्षयने तिच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलीला मारून टाकले असा फोनही केला होता. भाविकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विरार पोलिसांनी हल्लेखोर अक्षय याला अटक केली आहे.