लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : प्रियकराने आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने प्रेयसीनेही आत्महत्या केल्याची घटना नायगाव येथे उघडकीस आली आहे. जितेंद्र वर्मा आणि छाया गुप्ता असे या आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. जितेंद्र हा त्याची प्रेयसी छायाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा आग्रह करत होता. मात्र तिने नकार दिल्याने शनिवारी जितेंद्रने आत्महत्या केली होती.

जितेंद्र वर्मा (२४) आणि छाया गुप्ता (१७) या दोघांचे प्रेमसंबध गोते. जितेंद्र हा नायगाव पूर्वेच्या कोल्ही गावातील आशानगर मधील अऱविंद चाळीच रहात होता. जितेंद्र एका खासगी कंपनीत कामाला होता. तर अल्पवयीन असलेली छाया शिक्षण घेत होते. जितेंद्रला छायासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहायचे होते. त्यासाठी तो तिला आग्रह करत होता. मात्र छाया त्यासाठी तयार नव्हती. ती लहान असल्याने एकत्र राहण्यास तयार नव्हती.

शनिवारी छाया जितेंद्रला भेटायला त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी जितेंद्रने पुन्हा छायाला ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये राहण्याचा आग्रह केला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. जर छाया सोबत राहिली नाही तर ती भविष्यात सोडून निघून जाईल अशी जितेंद्रला भीती वाटत होती. तू ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये रहा नाहीतर मी आत्महत्या करेन असे तो तिला सांगत होता. परंतु छायाने त्याचे बोलणे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे त्याने रात्रीच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला पांढर्‍या रंगाच्या सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी नायगाव पोलीस ठआण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अन्वये अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती.

हा प्रकार छायाला समजताच तिला मोठा धक्का बसला. ती नैराश्यात गेली होती. तिच्या कुटुंबियांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती धक्क्यातून सावरली नाही. मी जितेंद्रचं ऐकलं असतं तर त्याचा जीव वाचला असता असं तिला वाटत होतं. त्याच्या मृत्यूला मी जबाबदार आहे अशी खंत तिला सतावत होती. त्यात नैराश्यातून तिने रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

जितेंद्र आणि छाया या दोघांचे प्रेमसंबंध होते. जितेंद्रला छायाला लिव्ह इन मध्ये राहण्याचा आग्रह करत होता. पंरतु छाया तयार नव्हती. म्हणून शनिवारी जितेंद्रने आत्महत्या केली आणि तो धक्का सहन न झाल्याने रविवारी छायाने देखील आत्महत्या केली, असे नायगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र पाटील यांनी सांगितले. या जोडप्याच्या आत्महत्येमुळे नायगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.