लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने ४ वर्षांने हरिद्वार येथून अटक केली. नाव बदलून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

आरोपी अनिल बिडलान हा याचे नालासोपारा येथील एका महिलेशी प्रेमसंबध होते. या महिलेला पहिल्या पतीपासून १८ वर्षांची मुलगी आहे. बिडलान या महिलेच्या घरी ये-जा करत होता. २०२१ मध्ये पीडित मुलीची आई कामाला गेली होती. त्यावेळी आरोपी बिडलान तिच्या घरी गेला. त्याने तिला कामाच्या बहाण्याने एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे मुलीला प्रंचड मानसिक धक्का बसला होता. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात बिडलान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तेव्हापासून तो फरार होता.

आणखी वाचा-वसई- पालिकेची ११ आरोग्य केंद्रे सेवेत

आरोपी बिडलनाच्या प्रकरणाचा तपास मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून तपास सुरू केला. बिडलना हा उत्तराखंडच्या हरिद्वार येथे नाव बदलून रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याला सापळा लावून अटक केली. पुढील तपासासाठी त्याला नालोसापारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्वीन पाटील आदींच्या पथकाने या आरोपीला पकडण्यात यश मिळवले.

Story img Loader