वसई : पोलिसांची गस्त, सोनसाखळी चोरांच्या टोळक्यांची धरपकड आणि कडक बंदोबस्त यामुळे वसई विरार येथील सोनसाखळी चोरीच्या घटनांत लक्षणीय घट झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सोनसाखळी चोरीच्या घटनांत निम्म्याने घट झाली आहे. वसई-विरारमध्ये सोनसाखळी चोरांचे प्रमाण वाढले होते. पादचाऱ्यांच्या गळय़ातील साखळी अथवा मंगळसूत्र खेचून पळून जाणाऱ्या अनेक टोळय़ा मधल्या काळात सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य केले जात होते. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मागील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या तब्बल ७६ घटना घडल्या होत्या. पोलिसांनी त्यापैकी ६१ गुन्ह्यांची उकल केली होती, मात्र या घटनांमळे नागरिक भयभीत होते.
अशा घटना रोखण्यासाठी स्थानिक पोलीस तसेच गुन्हे शाखामार्फत सक्त कारवाई करण्यात आली. सोनसाखळी चोरी करणाऱ्या अनेक टोळक्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी सकाळ, संध्याकाळी पोलीस गस्तीत वाढ करण्यात आली. त्यामुळे चालू वर्षांतील जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या केवळ २४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी १३ गुन्ह्यांची उकलदेखील करण्यात आली आहे. मागली वर्षांच्या ८ महिन्यांच्या तुलनेत यंदा सोनसाखळी चोरीचे गुन्हे ५२ ने कमी झाल्याची माहिती पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिली.
विविध पोलीस ठाण्यातील गुन्हे
पोलीस ठाणे दाखल गुन्हे उघडकीस आलेले गुन्हे
काशिमीरा १ ०
भाईंदर १ ०
नवघर ४ ३
तुळींज १ १
वालीव १ १
आचोळे ५ २
विरार ५ ३
पेल्हार २ १
नालासोपारा १ १
अर्नाळा सागरी ३ १
एकूण २४ १३