वसई : वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात मद्यपींचा हैदोस वाढू लागला आहे. गुरुवारी सायंकाळी या किल्ल्यात चार जणांचा गट मद्यपान करताना आढळून आला त्यांच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई पश्चिमेच्या भागात वसईचा ऐतिहासिक किल्ला आहे. किल्ल्याला विविध ठिकाणचे पर्यटक दुर्गप्रेमी भेट देत आहेत. किल्ल्याचे पावित्र्य राखले व त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी दुर्गप्रेमी झटत आहेत. सध्या या किल्ल्यात विविध प्रकारचे विघातक प्रकार समोर येऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता वसई किल्ल्यातील नागेश्वर मंदिराजवळच्या  बालेकिल्ला येथे काही मद्यपी मद्यपान करीत असल्याची माहिती वसईतील (ठाकरे गट) शिवसैनिकांना प्राप्त झाली. त्याची खातरजमा करण्यासाठी कोर्ट नाका विभाग प्रमुख दत्ता जाधव, उमेळा विभाग प्रमुख राकेश कदम यांनी त्याठिकाणी भेट दिली. पुरातत्व विभागाच्या कार्यालयासमोर ऐतिहासिक किल्ल्याच्या वरच्या बाजूस चार ते पाच जणांचा गट त्याठिकाणी मद्यपान करण्यास बसल्याचे निदर्शनास आले आहे. या चारही जणांची मद्यपान करतानाची चित्रफीत काढून त्यांना वसई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी वसई पोलिसांनी विक्रम पांडे, अशोक पासवान,अरविंद गुप्ता, नंदलाल यादव या चार जणांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ अन्वये कलम ८५(१)व प्राचीन स्मारके आणि पुरातन जागा व अवशेष याबाबत अधिनियम, १९५८ कलम ३० (१) नुसार गुन्हा दाखल केला असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी सांगितले आहे. या घडलेल्या प्रकाराची चित्रफीत आता समाजमाध्यमातून प्रसारित होत असल्याने दुर्गप्रेमीकडून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : खासगी रुग्णालयांना दिलासा, महात्मा फुले जनआरोग्य योजनतील शस्त्रक्रियांच्या दरात वाढ

किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यात चित्रीकरण करणे, गैरकृत्य, मद्यपान करणे, रील तयार करणे असे एकापाठोपाठ एक विघातक प्रकार समोर येऊ लागले आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागामार्फत बारा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत तरीही सर्रासपणे असे प्रकार समोर येत असल्याने किल्ल्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.