सुहास बिऱ्हाडे / कल्पेश भोईर
वसई: आज जागतिक आरोग्य दिन साजरा होत आहे, परंतु वसई विरार शहर आणि परिसराची आरोग्य व्यवस्था मात्र ढासळली आहे. पालिकेची आरोग्य सुविधा मोफत असली तरी आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्टरांचा आणि सोयीसुविधांचा अभाव आहे. प्रस्तावित रुग्णालये रखडली असून आरोग्य केंद्राची दुरवस्था झालेली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
माता-बालसंगोपन केंद्रातील बायोकेमिस्ट्री यंत्रणा वर्षभर बंद
नालासोपाऱ्यातील सर्वोदय येथे पालिकेचे माता-बालसंगोपन केंद्र आहे. येथे मोठय़ा संख्येने गर्भवती महिला प्रसूती व इतर तपासणी करण्यासाठी येतात. त्यांच्या रक्त तपासणीसाठी केंद्रात बायोकेमिस्ट्री यंत्रणा लावण्यात आली होती. ही यंत्रणा गेले वर्षभर बंद पडली आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या गर्भवती महिलांना इतर ठिकाणी रक्त तपासणीसाठी जावे लागत होते. त्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च होत असत. भाजपचे मनोज बारोट यांनी पालिका आयुक्तांकडे ही यंत्रणा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने अवघ्या चोवीस तासांच्या आत नवीन यंत्र खरेदी करून बायोकेमिस्ट्रीद्वारे तपासणी सुरू केली आहे. गेले वर्षभर बंद असलेली ही यंत्रणा पालिकेला दिसली नाही का? केवळ राजकीय नेत्यांनी सांगितल्यावरच कामे होणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शवविच्छेदनासाठी पालिकेकडे केंद्र नाही
वसई विरार महापालिकेकडे अजूनही स्वत:चे असे शवविच्छेदन गृह व शवागार नाही. त्यामुळे शहरातील मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याचा संपूर्ण भार सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रावर येतो. वसई विरारसारख्या मोठय़ा शहरांत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र पालिका स्थापन होऊन अनेक वर्षे लोटली तरी पालिकेचे शवविच्छेदन केंद्र तयार होऊ शकले नाही. सध्या शवविच्छेदनासाठी जिल्हा परिषदेच्या कामण, नवघर, आगाशी, विरार या आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागतो.
नवीन आरोग्य केंद्रासाठी जागा नाही
वसई विरार महापालिकेची २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, वसई येथील सर डी एम पेटीट रुग्णालय आणि नालासोपारा येथील तुळिंज रुग्णालय आणि २ माता बालसंगोपन केंद्रे आहेत. वाढती लोकसंख्या व शासन नियमानुसार ५० हजार लोकसंख्या असलेल्या भागाला एक आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेता शहराच्या विविध ठिकाणच्या भागात पालिकेच्या आरोग्य विभागाकडून आणखीन २२ नवीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या आरोग्य केंद्राची संख्या ४३ होणार होती. आता या केंद्राच्या उभारणीसाठी आवश्यक जागेचा शोध सुरू आहे, असे महापालिकेचे उपायुक्त डॉ. विजयकुमार द्वासे यांनी सांगितले. जशी जागा उपलब्ध होईल तसा प्रस्ताव तयार करून आरोग्य केंद्रे तयार केली जातील असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप जागा मिळालेली नसल्याने ही केंद्रे रखडली आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांची दुरवस्था
वसईतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वसई तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत आणि ३२ उपकेंद्रे आहेत. मात्र ही आरोग्य केंद्रे अनेक वर्षे जुनी आहेत. त्यांन दुरुस्तीची गरज आहे. विरार पूर्वच्या चंदनसार येथील आरोग्य केंद्रात पाणीटंचाई, अतिक्रमण यासह इतर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. काही ठिकाणी तर कचऱ्याचे साम्राज्य आहे. सोपारा, नवघर या आरोग्य केंद्राची अवस्थाही बिकट झाली आहे. गळकी छपरे, जुन्या इमारती, भिंतीने तडे, खिळखिळी झालेली बांधकामे यामुळे काही आरोग्यकेंद्रे तर कोसळण्याच्या स्थितीत आहेत. मात्र शासनाकडून या केंद्राची डागडुजी व नूतनीकरण केले जात नाही. आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी योग्य सुविधा नाही. त्यामुळे जुन्या इमारतीत कर्मचारी राहतात.

Story img Loader