नालेसफाईचा दावा फोल

भाईंदर : बुधवारी पहिल्या पावसाच्या हजेरी लागताच संपूर्ण मिरा-भाईंदर  शहर जलमय झाले असल्याचे दिसून आले. विशेष बाब म्हणजे अवघ्या एक दिवसापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण झाला असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतरदेखील सर्वत्र पाणी साचल्यामुळे नालेसफाईचा दावा फोल ठरला असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.

सोमवारी मध्य रात्री सुरू झालेल्या पावसाने मंगळवार दुपारपर्यंत जोर धरला होता. अनेक ठिकाणी सखल भागात सर्वत्र पाणी साचून नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरल्याने आर्थिक नुकसान झाले. यात प्रमुख्याने भाईंदरमधील बी. पी. रोड, बेकरी गल्ली, नवघर, काशीनगर, मुर्धा तसेच मीरारोड येथील काशिमीरा, नयानगर, हाटकेश भागाचा समावेश आहे.  मीरा-भाईंदर शहरात प्रतिवर्षी एप्रिल ते मे महिन्याच्या अखेरीस नालेसफाईचे काम करण्यात येते. या कामाकरिता खासगी कंत्राटदाराची निवड करण्यात येत असून  प्रशासनाकडून कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येतात. यावर्षी हे काम एम ई कन्स्ट्रक्शन  कंपनीला देण्यात आले आहे. शहरात जागोजागी उपलब्ध असलेल्या लहान—मोठय़ा गटारांची सफाई करण्यात येत आहे. मात्र हे काम योग्य पद्धतीने न झाल्याने शहर पाण्याखाली गेले असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे.

धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला

मुसळधार पावसामुळे भाईंदर पूर्व येथील गोडदेव भागात साई पॅलेस या धोकादायक इमारतीचा सज्जा पडला असल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही इमारत पालिकेमार्फत धोकादायक ठरवल्यानंतर वर्षभरापूर्वीच मोकळी करण्यात आली होती. इमारतीमधील पदाधिकारी इमारत पाडणार असल्यामुळे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र सज्जा कोसळल्याची घटना घडताच घटनास्थळी पालिका प्रशासनाचे पथक पोहचून  इमारत पाडण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात आले असे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.   इमारतीमधील नागरिकांन मदत करणार असल्याचे आश्वासन  आमदार गीता जैन यांनी  दिले.

Story img Loader