प्रसेनजीत इंगळे

कोविड रुग्णालयांवर कारवाईची टाच वसई-विरारमधील अग्निशमन यंत्रणेबाबत २० रुग्णालयांना सात दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

विरार : कोविड रुग्णालयांच्या अग्नीसुरक्षेबाबत मुदत संपूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने ‘लोकसत्ता’ने प्रशासनाच्या गलथान कारभाराविषयी  लक्ष वेधले होते. याची दखल घेत पालिका अग्निशमन यंत्रणा अद्ययावत न करणाऱ्या २० रुग्णालयांवर कारवाई करण्यासाठी सरसावली आहे. या रुग्णालयांना सात दिवसांच्या आत अहवाल सदर करा, अन्यथारुग्णालयांचे परवाने रद्द केले जातील अशी ताकीद पालिकेने दिली आहे.

विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर शहरातील इतर कोविड रुग्णालयांची अग्नीसुरक्षेसंदर्भात मुदत संपूनही पालिका कोणतीही कारवाई करत नसल्याचे आढळून आले आहे. केवळ नोटीस बजावण्याचे धोरण पालिका करत असल्याचे आढळून आले आहे. पालिकेच्या अग्निशमन विभागाने माहिती दिली की, विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर सर्व रुग्णालयांना नोटीस बजावल्या होत्या. यात प्रामुख्याने कोविड ४५ रुग्णालयांना तातडीने अहवाल सदर करण्यासचे संगितले होते. त्यानुसार पलिकेने या रुग्णालयांची पाहणी केली यात ३९ रुग्णालयांत काही त्रुटी आढळून आल्या. त्यांना या त्रुटी दूर करून पुन्हा नव्याने अहवाल सदर करण्याचे आदेश दिले होते. यात केवळ १९ रुग्णालयांनी यंत्रणा सक्षम करण्यास सुरुवात केली. तर २० रुग्णालयांनी  प्रतिसाद दिला नाही. यामुळे या रुग्णालयांना ७ दिवसांची मुदत देण्यात आली अशी माहिती मुख्य अग्निशमन विभागाने दिली आहे.  पण इतर रुग्णालयांचे काय याबाबत पालिका अग्निशमन विभाग कोणतीही माहिती देण्यास असमर्थ आहे.

लेखापरीक्षण करण्यास खासगी रुग्णालये असमर्थ

वसई-विरार परिसरात २७७ हून अधिक रुग्णालये आहेत यात बहुतांश रुग्णालयांचे अग्नीसुरक्षा लेखापरीक्षण प्रलंबित आहे.  पालिकेने नोटीस बजावल्यानंतर डॉक्टर आणि रुग्णालय संघटनांनी पालिकेला भेटी देवून यासाठी अधिक काळ मुदत वाढवून मागितली होती.  करोना काळात  विनाकोविड रुग्णालयांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला आहे. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे.   वसई विरारमधील बहुतांश रुग्णालये ही निवासी संकुलात किंवा जुन्या इमारतीत आहेत.

यातील बहुतांश अधिक इमारतीत अर्थिग नसल्याने विद्युत लेखापरीक्षण पूर्ण होऊ शकत नाही. आणि इमारतीचे अर्थिग करून घेण्यास अधिक वेळ लागू शकतो. यामुळे पालिकेने काही अटी शिथिल करून रुग्णालयांना सहकार्य करावे, असे आवाहन नालासोपारा डॉक्टर असोसियशनचे अध्यक्ष डॉ. संजय मांजलकर यांनी केले आहे.  लवकरच बहुतांश रुग्णालये पालिकेचे नियम पाळून अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करतील असेही त्यांनी सांगितले.